दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण सुरू झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत सोन्याचे दर जवळपास 20 हजार रुपयांनी घसरले असून, यामागे नेमकी कारण काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदार नफा मिळवण्यासाठी सोन्याची विक्री करतात. त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढतो आणि खरेदीदार कमी झाल्याने किमती घसरतात. या प्रक्रियेला प्राइस करेक्शन म्हणतात.
अमेरिकेच्या 10 वर्षांच्या सरकारी बॉन्ड्सवरील परतावा 5% च्या पुढे गेल्याची माहिती आहे. त्याचा परिणाम झाल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी गुंतवणूकदार सरकारी बॉन्ड्सकडे वळत आहेत. याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात. डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांमध्ये सोनं खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ते महाग पडतं. परिणामी सोन्याची मागणी कमी होऊन किमती घसरण्याची शक्यता वाढते.
अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा वाढल्याने व्याजदरांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवू शकते, या शक्यतेमुळे डॉलर मजबूत होण्यास मदत मिळू शकते. याचा सोन्याच्या किमतीवर दबाव येऊ शकतो.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाई आणि डॉलरच्या मजबुतीबाबतची चिंता वाढते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती आणखी घसरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Source: TV9 Marathi Business






