Hashtagintro

दुष्काळग्रस्त ३०५ तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त ३०५ तालुक्यांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा दिला आहे. अनुदानित शाळांसह खासगी शाळांनाही विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालक शहरात राहत असले, तरी त्यांची शेती दुष्काळग्रस्त तालुक्यात असल्यास त्यांच्या पाल्यांनाही या सवलतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सोमवारी दिली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. शाळांनी परीक्षा शुल्कमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, असे मंत्री भोयर म्हणाले. दरम्यान, नोंदणीकृत सावकारांनी नियमबाह्य पद्धतीने व्याजाची वसुली करू नये, असा इशाराही भोयर यांनी दिला. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त व्याज वसूल केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित सावकाराची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नांदेडमधील एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या प्रकरणात घातपाताची शक्यता तपासली जात असून, पोलिसांचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
https://www.prahaar.in/2026/10/26/running-electric-shivai-bus-catches-fire-in-pune-seventeen-passengers-safe-dramatic-video-goes-viral/
वित्तीय कंपन्यांकडून सक्तीने वसुली करण्याच्या प्रकारांनाही आळा घालण्यात येईल. गरज पडल्यास सूक्ष्म वित्तपुरवठा कंपन्यांसंदर्भात कठोर निर्णय घेतले जातील, असे भोयर यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे भंडारा येथे बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून एका साप्ताहिकाच्या अधिस्वीकृतीधारक पत्रकाराला मारहाण झाल्याच्या प्रकरणाचीही भोयर यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अवाजवी अतिरिक्त खर्च केला जात असल्याबद्दल विचारले असता, वरिष्ठ अधिकारी त्याची दखल घेतील, असेही त्यांनी सांगितले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language