Hashtagintro

Nashik : सप्तशृंगीगडावर कोजागरी पौर्णिमेचा उत्सव भक्तिमय वातावरणात, 3 लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

सप्तशृंगगड (नाशिक) : महाराष्ट्रातील आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या गडावर कोजागरी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या या धार्मिक पर्वासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमधून तीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी गडावर हजेरी लावली. ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने संपूर्ण सप्तशृंगी गड परिसर भक्तिमय झाला होता.

पंचामृत पूजन आणि पवित्र जलाने देवीला अभिषेक
कोजागरी पौर्णिमेनिमित्त रविवारी, २५ तारखेला सकाळी विधानपरिषदेचे आमदार गोकुळ गिते आणि विश्वस्त संस्थेचे देणगीदार सुदर्शन हेगडे यांनी सपत्नीक श्री सप्तशृंगी मातेची पंचामृत महापूजा केली. सायंकाळी विविध भागांतून कावड यात्रेद्वारे आणलेल्या पवित्र जलाने देवीला जलाभिषेक करण्यात आला. सायंकाळची महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनूने यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनीही देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी प्रशासनातील अधिकारी आणि मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

कावड यात्रांनी गडावर उत्साहाचे वातावरण
कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येपासूनच सप्तशृंगगडावर भाविकांची गर्दी वाढू लागली होती. विविध ठिकाणांहून आलेल्या कावड यात्रांमुळे उत्सवाला विशेष धार्मिक रंग चढला. ढोल-ताशांचा गजर, तुताऱ्यांचे सूर, गुलालाची उधळण आणि पालखी मिरवणुकांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. उत्सवासाठी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने भाविकांना मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच पिंपळनेर येथील विश्वरूहाणी मानव केंद्राच्या माध्यमातून महाप्रसादासह मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या.
https://www.prahaar.in/2026/10/26/nashik-chaos-at-a-wedding-venue-in-nashik-a-violent-clash-broke-out-between-the-families-of-the-bride-and-the-groom-it-is-alleged-that-an-attempt-was-made-to-set-the-groom-on-fire-after-dousing-him/
तृतीयपंथीयांचा पारंपरिक मेळावा आणि दीक्षा सोहळा
सप्तशृंगगडावरील कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तृतीयपंथीयांचा पारंपरिक मेळावा. ही परंपरा यंदाही धार्मिक श्रद्धेने जपण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या तृतीयपंथीयांनी शिवालय तलावावर स्नान करून पूजा-अर्चा केली.प्रमुख गुरूंच्या नेतृत्वाखाली वाद्यांच्या गजरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परंपरेनुसार नवीन शिष्यांना दीक्षा देण्याचा धार्मिक विधी पार पडला. रात्री देवीचा जागर करून भाविकांनी नवसपूर्ती केली.

प्रशासनाकडून वाहतूक आणि सुरक्षेचे नियोजन
उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने विशेष नियोजन केले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगड मार्गावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. भाविकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. पोलिसांचा कडक बंदोबस्त, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे गर्दीचे नियोजन व्यवस्थित करण्यात आले.

भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम
लाखो भाविकांची उपस्थिती, कावड यात्रांचा उत्साह, धार्मिक विधी, महाप्रसादाचे वाटप आणि तृतीयपंथीयांचा पारंपरिक मेळावा यांमुळे यंदाचा कोजागरी पौर्णिमा उत्सव विशेष ठरला. प्रशासनाच्या नियोजनामुळे आणि भाविकांच्या सहकार्यामुळे हा सोहळा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सप्तशृंगगडावरील या उत्सवाने धार्मिक श्रद्धा, सामाजिक परंपरा आणि भक्तीभावाचा सुंदर संगम पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language