Hashtagintro

Solapur News : पाणी सोडूनही जाधववाडी, बैरागवाडी कोरडीच

मोडनिंब : जाधववाडी व बैरागवाडी (ता. माढा) या गावांना सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, यासाठी काही दिवसांपूर्वी सोलापूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने पिण्यासाठी पाणी सोडतो, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ८ नंबर फाट्याने पाणी सोडूनही जाधववाडी व बैरागवाडीला थेंबभरही पाणी मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जाधववाडी व बैरागवाडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून लक्षवेधी आंदोलन केले. जोपर्यंत कॅनॉलवरील बेकायदा सायफन आणि विद्युत मोटारी काढत नाहीत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत, तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

पाटबंधारे विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असून त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वाटेतच पाणी पळवले जात असताना अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, गेली तीन वर्षे आमच्या उन्हाळी पाण्याची पाळी चोरीला जात आहे. दरवर्षी कागदावर पाणी सुटते, पण प्रत्यक्षात ते आमच्यापर्यंत येतच नाही. अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर जाधववाडी-बैरागवाडीला पाणी येण्यास कसलाही उशीर होणार नाही, असे शेतकरी ठामपणे सांगत आहेत.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पाटबंधारे अधिकारी दखल घेत नसल्याने नाईलाजास्तव शेतकरी स्वतः कॅनॉलवर पाण्यासाठी गेले असता, तेथील काही लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत आमचे काही शेतकरी बांधव जखमीही झाले आहेत. याला जबाबदार अधिकारीच आहेत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language