Hashtagintro

Belgaum News : डॉक्टर गायब; गर्भवती महिला ताटकळत

बेळगाव : गोरगरीब रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने उभारण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरहजेरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. डॉक्टरच हजर नसल्याने एका गर्भवती महिलेला तब्बल दीड तास ताटकळत बसावे लागल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ३) रुग्णालयातील ८४ क्रमांकाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) समोर आला आहे. प्रसूतीसारख्या संवेदनशील विभागातही डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नसतील तर सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी कोणाकडे दाद मागायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या गैरहजेरीचे प्रकार वारंवार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. डॉक्टर बैठकीला गेले आहेत, असे सांगून रुग्णांना प्रतीक्षा करायला लावली जाते. काही बाह्यरुग्ण विभागांमध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्णांना तासन्‌तास थांबावे लागते. विशेषतः गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना याचा ­­­­त्रास सहन करावा लागत आहे.

शासकीय रुग्णालयात सेवा बजावण्यासाठी वेतन घेणारे काही डॉक्टर खासगी रुग्णालयांमध्येही सेवा देत असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी शासकीय रुग्णालयातील त्यांच्या उपस्थितीवर परिणाम होत असल्याचा आरोप रुग्णांकडून केला जात आहे. सरकारी रुग्णालयातील जबाबदारीला प्राधान्य देण्याऐवजी रुग्णांना प्रतीक्षेत ठेवले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रसूती विभागासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी डॉक्टरांची अनुपस्थिती रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. गर्भवती महिलेला दीड तास प्रतीक्षा करावी लागण्याच्या प्रकाराची बिम्स प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित डॉक्टरांच्या उपस्थितीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रादेशिक आयुक्त आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी लक्ष घालणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language