सातारा : सातारा जिल्हा परिषद नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी, चारा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरच्या संख्येत वाढ होवू शकते त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेने नियोजन काय केले आहे. याची माहिती घेवून सर्व विभागातील अधिकाऱ्यांना दुष्काळाबाबत उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ना. गोरे म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किती ठिकाणी टँकर सुरू आहेत. भविष्यात आणखी किती ठिकाणी पाण्याचे टॅंकर लागणार आहेत, चाऱ्याची परिस्थिती काय आहे ? यावर चर्चा झाली आहे. सध्या ४८ टँकर सुरू असून आणखी टँकरच्या संख्येत वाढ होईल. जनावराच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याबाबत उपाययोजनासंदर्भात पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांना ब्रेक देण्याच्या ठराबाबत छेडले असता ना. गोरे म्हणाले, सदस्यांच्या भावना योग्य आहेत. त्या भावनेचा मी आदर करतो.
परंतु, जिल्हा परिषदेमध्ये डीपीडीसीची कामे थांबवणे हे उचित नाही, माझी त्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यांच्या भावनांचा आदर करून भविष्यामध्ये लवकरात लवकर जिल्हा परिषदेमधून डीपीडीसीला सदस्य देता येतील अशी व्यवस्था करू. डीपीडीसीच्या कामांना मान्यता थांबविलेली नव्हती आताही थांबवणार नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी जि.प. अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, कृषि सभापती लता कर्णे, महिला बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन. जि.प. सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
Source: Pudhari News
