सांगली : दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना आणि सर्वजण कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करीत असताना, सांगली जिल्ह्यातील साडेतीन हजार एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र प्रवासात आणि रस्त्यातच साजरी होत आहे. कर्मचाऱ्यांची रजा, सुटी २० नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांची फराळाची, दिवाळी सणाच्या अंघोळीची सोय आगारातच केली आहे.
सांगली जिल्ह्यात ३ हजार ६५० एसटी कर्मचारी दहाही आगारात काम करीत आहेत. यामध्ये अडीच हजारहून अधिक कर्मचारी हे वाहक आणि चालक आहेत. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा दहा हजार रुपयांच्या बोनसमुळे गोड झाली आहे. असे असले तरी सर्वांनी दिवाळी साजरी करावी, या भावनेतून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी एसटीचे कर्मचारी रात्रीचा दिवस करीत आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या १ ते २० नोव्हेंबरपर्यंतच्या सुट्या, रजा रद्द करण्यात आल्या आहेत. यामधील बहुतांशी कर्मचाऱ्यांना घरी जाताही येणार नाही. नुकत्याच झालेल्या आंदोलनात सहा, सहा तास त्यांना महामार्गावरच थांबून राहण्याची वेळ आली आहे. सांगली जिल्ह्यातून दिवाळीसाठी ८० जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. रोजच्या सहाशेहून अधिक बसेसच्या फेर्या सुरूच आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना रात्रं-दिवस काम करण्याची वेळ आली आहे. यासाठी प्रशासनाने आगारात त्यांची सोय केली आहे. या सुविधा कर्नाटकच्या कर्मचाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना विश्रामगृहात जागा मिळत नसल्यामुळे हे कर्मचारी मच्छरदाणी बांधून बसमध्येच रात्रीची झोप घेत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीत या आहेत सुविधा…
विश्रांतीसाठी विश्रामगृहात झोपण्याची सुविधा.
अंंघोळीसाठी गरम पाण्याबरोबर इतर सुविधा.
रोज फराळ, चहाची सोय.
Source: Pudhari News
