Hashtagintro

लता आणि सुमन कल्याणपूर यांनी एकत्र गायलेले एकमेव गाणे, अभिनेत्री हेलन आणि शैला वाज यांच्यावर चित्रित, कोणी कोणाला आवाज दिला, ओळखा पाहू?

लता आणि सुमन कल्याणपूर यांनी एकत्र गायलेले एकमेव गाणे, अभिनेत्री हेलन आणि शैला वाज यांच्यावर चित्रित, कोणी कोणाला आवाज दिला, ओळखा पाहू?

लता मंगेशकर यांना स्वर्गीय आवाजाचे देणे मिळाले होते. मात्र, त्यांच्यासारखा आवाज मराठीतील आणखी एका गायिकेचा होता, ती गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर होय. दोघी ज्येष्ठ गायिका आज जगात नाहीत. लता आणि सुमन यांच्या आवाजात इतके साम्य होते की अगदी दर्दी रसिकालाही समजायला बराच प्रयत्न करावा लागतो. अशा एका गाण्याची माहिती आपण आज घेणार आहोत, हे गाणे या दिग्गज गायिकांनी एकत्र गायलेले एकमेव द्वंद्वगीत आहे. चला तर मगे हे गीत कोणते ते पाहूयात आणि तुम्हालाही लताचा आवाज कोणता आणि सुमन कल्याणपूर यांचा कोणता हे ओळखता येते का हे पाहूयात…

लता मंगेशकर ऐन उमेदीच्या काळात असताना सुमन कल्याणपूर यांच्या गाण्याची कारकीर्द सुरु झाली होती. त्यांचे वडील शंकरराव हेमाडी हे बँकेत मोठे अधिकारी होते. त्यांची बांगलादेशाची राजधानी ढाका येथे बदली झाली होती. सुमन हेमाडी – कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ ढाका येथे झाला होता. त्यानंतर त्यांची बदली मुंबईत झाल्याने सुमन कल्याणपूर मुंबईत आल्या आणि स्थिरावल्या. त्यांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्टला प्रवेश घेतला होता. मात्र, दुसऱ्या वर्षाला असताना टर्पेंटाईनची त्यांना अलर्जी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गायनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांच्या आदर्श नूरजहाँ होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी, हिंदी आणि इतर भाषिक गाणी गायली. त्यांची स्वत:ची स्वतंत्र  शैली होती. तरी त्यांचा आवाज लता यांच्यासारखा असल्याने त्यांना अनेकदा लता दिदींच्या आवाजात गाण्यास सांगितले जायचे.

मराठीतील अनेक भावगीते सुमन कल्याणपूर यांनी गायली असली तरी ती लता दिदींनी गायल्याचा भास अनेकांना होत असतो. असेच एक गीत साल १९५९ मध्ये आलेल्या ‘चाँद’ चित्रपटासाठी या दोघींनी गायले. या दोघींनी गायलेले हे एकमेव द्वंद्वगीत आहे. ‘कभी आज कभी कल कभी परसों’ हे गीत गीतकार शैलेंद्र यांनी लिहीले होते आणि हेमंत कुमार यांनी या गीताला संगितबद्ध केले होते. या गीतात पडद्यावर अभिनेत्री हेलन आणि शैला वाझ या नृत्य करताना दिसत आहेत. मात्र, यातील हेलन यांना दिलेला आवाज लता यांचा आहे की सुमन कल्याणपूर यांचा आहे हे भलभल्यांना कळणे कठीण आहे. आजही हे गीत ऐकले तर दोन्ही गायिकांचा आवाजातील फरक ओळखणे कठीण आहे. काही वेबसाईटनुसार यात हेलन यांना दिलेला आवाज सुमन कल्याणपूर तर शैला वाझ यांना दिलेला आवाज लता मंगेशकर यांचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, यावर अधिक खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language