
सैराट या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. पहिल्याच सिनेमातून रिंकू राजगुरूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. रिंकूच्या प्रत्येक सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. सध्या सोशल मीडियावर रिंकूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये निर्जन रस्त्यावर रिंकू एकटीच दिसत आहे. हा व्हिडीओ रिंकू राजगुरूच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आहे.
रिंकूचा ‘जिजाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये घनदाट जंगल, रात्रीचा गडद अंधार, सुनसान रस्ता, एका बसमधील प्रवास, पोलिसांचा सुरू असलेला तपास आणि रिंकूचे दमदार अॅक्शन सीन्स दिसत आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू पहिल्यांदाच अॅक्शन भूमिकेत दिसत असून तिच्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय, तिच्यासमोर कोणती आव्हानं आहेत आणि या सगळ्यामागे कोणतं गूढ दडलं आहे.
काय असणार चित्रपटाची कथा?
घरातील जबाबदाऱ्या सांभाळत, कुटुंबासाठी धडपडत प्रत्येक स्त्री रोज घराबाहेर पडते. मात्र, या प्रवासात तिच्या सुरक्षेचं, तिच्या अस्तित्वाचं, स्वाभिमानाचं काय? अन्याय सहन करणं हीच तिची नियती असते की, त्याविरोधात उभं राहाण्याची ताकदही तिच्यात असते? एखादी स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार करते, तेव्हा तिच्यातील उग्र रूप कसं समोर येऊ शकतं हे ‘जिजाई’ या चित्रपटात दिसणार आहे.
कोणते कलाकार दिसणार?
या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेची कथेत नेमकी काय भूमिका आहे, याबद्दल ट्रेलरमध्ये पुरेशी उत्सुकता कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटातील व्यक्तिरेखांचे परस्परसंबंध आणि कथेतील अनपेक्षित वळणं जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Source: TV9 Marathi Entertainment
