Anirudh Ravichander House: दाक्षिणात्य संगीतविश्वातील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सनरायझर्स हैदराबादची सहमालक आणि प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी काव्या मारन हिच्यासोबत त्याने नुकताच विवाह केला. 11 नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये या जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता अनिरुद्धच्या चेन्नईतील घराचीही चर्चा रंगली आहे.
कोट्यवधींची कमाई करणाऱ्या या संगीतकाराच्या घरात अनेक खास गोष्टी आहेत. मात्र, त्याच्या बेडरूममध्ये चक्क बेडच नसल्याचं समोर आलं आहे. अनिरुद्धने 2021 मध्ये 'एशियन पेंट्स'च्या 'Where The Heart Is' या होम टूर कार्यक्रमात त्याच्या घराची झलक दाखवली होती. यावेळी त्याने बेडरूममधील एक खास गोष्ट सांगितली.
सेलिब्रिटींच्या घरांमध्ये महागडे फर्निचर आणि आलिशान बेड पाहायला मिळतात. मात्र, अनिरुद्धच्या खोलीत पारंपरिक बेड नाही. तो थेट जमिनीवर गादी टाकून झोपतो. जमिनीवर झोपायला आपल्याला आवडतं, यामागचं नेमकं कारण माहीत नसल्याचंही त्याने सांगितलं. त्याने मजेशीरपणे असंही म्हटलं होतं की, कुठेतरी वाचलं होतं, अविवाहित मुलांना जमिनीवर झोपायला आवडतं.
अनिरुद्धकडे फारसे कपडे नसल्यामुळे मोठ्या वॉर्डरोबची किंवा जास्त स्टोरेजचीही गरज नसल्याचं त्याने सांगितलं होतं. अनिरुद्धचं चेन्नईतील घर आधुनिक सजावट आणि दक्षिण भारतीय पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम आहे. घराच्या प्रवेशद्वारावर कोरीव लाकडी दरवाजा असून लिव्हिंग रूममध्ये पारंपरिक लाकडी झोपाळा आहे. हिरव्या रंगाचे सोफे, चेक डिझाइनच्या खुर्च्या, पांढरा फरशीचा भाग आणि सुंदर पेंटिंग्ज घराला वेगळा लूक देतात.
या घरातील सर्वात खास जागा म्हणजे 'मेमरी वॉल'. या भिंतीवर अनिरुद्धच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या प्रवासातील अनेक आठवणींचे फोटो लावले आहेत. वडील रवी राघवेंद्र यांच्यासोबतचे फोटोही यात आहेत. ही जागा आपल्यासाठी अत्यंत खास असल्याचं अनिरुद्धने सांगितलं होतं.
अनिरुद्धच्या घरात स्वतंत्र होम थिएटर असून तिथे तो कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचा आनंद घेतो. घराचा विस्तार केल्यानंतर ही जागा तयार करण्यात आली. याशिवाय एक छोटी लायब्ररी आणि ऑफिससुद्धा आहे. इथे तो चित्रपटांच्या कथा आणि स्क्रिप्ट ऐकतो. विशेष म्हणजे, या घरात सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबतचा फोटोही पाहायला मिळतो. अनिरुद्ध त्यांना प्रेमाने 'थलायवा' म्हणतो.
संगीतविश्वात मोठं नाव कमावल्यानंतरही अनिरुद्ध आपल्या आई-वडिलांसोबत राहणं पसंत करतो. कामाच्या धावपळीतून घरी आल्यानंतर त्याला कुटुंबासोबत निवांत वेळ घालवायला आवडतो. घर हे कामापासून दूर राहण्याचं आणि स्वतःला वेळ देण्याचं ठिकाण असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे कोट्यवधींची संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही अनिरुद्धच्या घरातील साधेपणा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
Source: TV9 Marathi Entertainment







