Hashtagintro

Nashik : नाशिकरोडमध्ये RPF जवानांची सतर्कता ! हातावर गोंदवलेल्या मोबाईल नंबरमुळे 9 वर्षीय रुद्राची कुटुंबीयांशी भेट

नाशिक : रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीत हरवलेल्या 9 वर्षीय चिमुरड्याला रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि चाईल्ड लाईनच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, या चिमुरड्याच्या हातावर आई-वडिलांनी आधीच गोंदवून ठेवलेला मोबाईल क्रमांक त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा दुवा ठरला. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नंदिग्राम एक्सप्रेसमधून उतरला एकटाच
मिळालेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर रोजी मुंबईहून आलेली नंदिग्राम एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबली होती. यावेळी फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. प्रवासी डब्यातून उतरत असताना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संदीप खटना यांचे लक्ष एका लहान मुलाकडे गेले. सुमारे 9 वर्षांचा हा मुलगा एकटाच आणि घाबरलेल्या अवस्थेत दिसत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवान संदीप खटना यांनी तातडीने मुलाजवळ जाऊन त्याची विचारपूस केली. मात्र, घाबरल्यामुळे त्याला सुरुवातीला आपली माहिती व्यवस्थित सांगता येत नव्हती. त्यामुळे जवानांनी त्याला सुरक्षितपणे आरपीएफ कार्यालयात आणले.

हातावर गोंदवलेला मोबाईल नंबर ठरला महत्त्वाचा धागा
मुलाला धीर देत त्याची चौकशी सुरू असताना त्याच्या हाताच्या दंडावर गोंदवलेले नाव आणि मोबाईल क्रमांक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याच क्रमांकाच्या मदतीने मुलाच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रक्रियेदरम्यान चाईल्ड लाईनच्या सदस्या प्रणिता तपकिरे, निखिल पाटील आणि उपनिरीक्षक दिलीप कुमार यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी मुलाचे समुपदेशन करून आवश्यक ती सुरक्षित प्रक्रिया पूर्ण केली.
https://www.prahaar.in/2026/11/13/nashik-major-operation-by-the-rpf-in-nashik-a-suspicious-youth-was-apprehended-on-the-amrit-bharat-express-the-rpf-personnel-were-left-stunned-upon-discovering-the-cash-inside-his-bag/
धारावीतील वडिलांना दिली मुलगा सुखरूप असल्याची बातमी
अधिकाऱ्यांनी हातावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. फोनवर मुलाचे वडील शंकर रामबचन जायसवाल बोलत होते. ते मुंबईतील धारावी परिसरात राहतात.मुलगा हरवल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. त्याचा शोध घेण्यासाठी ते पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत होते. अशातच नाशिकरोड रेल्वे पोलिसांचा फोन आला आणि रुद्रा सुखरूप असल्याची माहिती मिळाली. ही बातमी ऐकताच वडिलांचा जीव भांड्यात पडला.

वडिलांना पाहताच रुद्राने मारली घट्ट मिठी
मुलगा सुखरूप असल्याचे समजताच कुटुंबीयांनी तातडीने मुंबईहून नाशिकरोड रेल्वे स्थानक गाठले. आरपीएफ कार्यालयात वडिलांना पाहताच रुद्राने त्यांना घट्ट मिठी मारली. बाप-लेकाच्या या भावनिक भेटीने उपस्थित पोलीस अधिकारी, चाईल्ड लाईनचे सदस्य आणि नागरिकही भारावून गेले. आपल्या मुलाला सुखरूप परत मिळाल्याने पालकांनी रेल्वे सुरक्षा दल आणि चाईल्ड लाईनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. एका छोट्याशा खबरदारीमुळे आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे हरवलेल्या चिमुरड्याला पुन्हा आपल्या कुटुंबाची माया मिळाली. मुलाच्या हातावर आधीच गोंदवलेला मोबाईल क्रमांक संकटसमयी किती महत्त्वाचा ठरू शकतो, याचे रुद्राच्या घटनेतून प्रत्यंतर आले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language