Hashtagintro

Diwali 2026 : मुंबई पोलिसांचा मध्यरात्री 'सर्जिकल स्ट्राईक'; फटाके फोडणाऱ्यांविरोधात 80 हून अधिक गुन्हे दाखल!

मुंबई : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटना आणि वाढत्या सुरक्षेच्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या निवासी भागात नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरभरात आतापर्यंत 80 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. फटाक्यांमुळे नागरिक जखमी होण्याच्या आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पोलीस केवळ नागरिकांच्या तक्रारींची वाट पाहत नसून, रात्रीच्या गस्तीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात स्वतःहून कारवाई करत आहेत. सार्वजनिक रस्ते आणि दाट लोकवस्तीच्या भागात फटाके फोडल्याने पादचारी, वाहनचालक आणि आसपासच्या इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन गस्तीवरील पोलीस पथके रात्रभर सतर्क आहेत.
अशीच एक कारवाई खार पोलिसांनी गुरुवारी पहाटे केली. खार पश्चिम येथील 20 व्या रोडवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास फटाके फोडणाऱ्या अक्षय जाधव या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बीट मार्शल कॉन्स्टेबल चेतन गायकवाड (वय 41) रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना हा प्रकार आढळून आला. मध्यरात्री फटाके फोडल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास होत होता. तसेच, वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी संबंधित तरुणाला नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे. खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांनी सांगितले की, “शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांत फटाक्यांबाबत तक्रारी येत आहेत. सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांवर पोलीस स्वतःहून लक्ष ठेवून गुन्हे नोंदवत आहेत.”
https://www.prahaar.in/2026/11/14/bmc-gears-up-for-balasaheb-thackeray-death-anniversary-mayor-ritu-tawde-gives-important-instructions-to-officials/
मुंबईच्या विविध भागांत अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 9 नोव्हेंबर रोजी काळबादेवी येथील सार्वजनिक रस्त्यावर 3 रॉकेट फोडल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अविनाश साहा (वय 34) याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. यातील 2 रॉकेट थेट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडकले, तर तिसरे रॉकेट एका इमारतीच्या भिंतीवर जाऊन आदळले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली.
11 आणि 12 नोव्हेंबर रोजी मलबार हिल पोलिसांनी नेपियन सी रोडवरील सार्वजनिक रस्ता आणि पदपथावर फटाके फोडल्याप्रकरणी कृष्णा ढेबे (वय 45) आणि अभय घडशी (वय 36) यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय, 4 ते 9 नोव्हेंबरदरम्यान दादर, कुर्ला, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई करून गुन्हे नोंदवले आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांची नजर कायम राहणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language