Hashtagintro

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेत भाजपचा वरचष्मा; राष्ट्रवादीला जागावाटपात फटका

नगर: जिल्हा बँकेच्या 11 जागा बिनविरोध झाल्या, तर 10 जागांसाठी निवडणुकीचा प्रचारही जोरात सुरू आहे. पडद्यामागे तर आताच सत्तासमीकरणांची जुळवाजुळवही सुरू झाल्याची चर्चा आहे. प्रस्थापितांच्या पॅनलमध्ये 19 पैकी (कर्जत-जामखेड सोडून) सर्वाधिक 8 उमेदवार हे भाजपकडे आहेत, काँग्रसने आपल्या चार जागा कायम ठेवल्या आहेत, ठाकरे सेनेच्या गडाखांनी दोन जागा घेतल्या, तर राष्ट्रवादीने पाच जागांसह चेअरमनपदही गमावल्याची चर्चा आहे.

सध्या त्यांचे पाच उमेदवार आहेत. उद्याच्या सत्तासमीकरणात पक्षीय पातळीवर बँकेत भाजपचाच वरचष्मा असणार आहे. जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक सुरू आहे. यातील 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सहा जागा भाजपाच्या, तर दोन काँग़्रेस आणि राष्ट्रवादी अन् गडाख यांची प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे. सभापती राम शिंदे यांची जामखेडला एक, अशा अकरा जागा बिनविरोध झाल्या.

गडाखांनी दोन जागा घेतल्या!

माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी यावेळी स्वतःसह ओबीसीचीही जागा आपल्याकडे घेतली. सोसायटीतून गडाख बिनविरोध बँकेत पोहचले. आता कारभारी जावळे यांच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ओबीसीची जागा काँग्रेसची होती. ती आता गडाखांकडे आली. गडाखांची जागावाटपात एकने बेरीज झाली आहे.

राष्ट्रवादी तहातच हरली; पुढे काय?

जिल्हा बँकेच्या सन 2021 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे 10 संचालक अन् चेअरमनपदही होते. मात्र, स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रस्थापितांच्या पॅनलमध्ये जागा वाटपात राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचे दिसले. राष्ट्रवादीकडे विधान परिषद सोडून विधानसभेचे चार आमदार आहेत. बँकेत जागावाटपात त्यांचा बार्गेनिंग पॉवर दिसला नाही. परिणामी, राजश्री चंद्रशेखर घुले, आशुतोष काळे, संजीवनी शिंदे, सचिन जगताप, अनुराधा नागवडे या पाचच जागा पक्षाला घेता आल्या. तर श्रीरामपूर, श्रीगोंदा, राहुरी, पारनेर आणि कर्जत या पाच जागा सोडाव्या लागल्या. आ. काशीनाथ दाते यांनी विचारात घेतले नाही, आता त्यांना प्रस्थापितांनाही सोडता येईना आणि खा. लंकेंसोबतही जाता येईना, अशी अवस्था झाली. तर अकोल्यात आ. लहामटे यांना आपल्याच पक्षातील गायकरांनी भाजपच्या पिचडांना जवळ करून कोंडीत पकडले. अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार राहुल जगताप, प्रशांत गायकवाड यांना सोयीस्कर बाजूला काढण्यात आले. गडाख, घुले, थोरात यांच्या लॉबीतील आ. आशुतोष काळे हे शेवटच्या क्षणी बिनविरोध का होऊ शकले नाही, यामागेही वेगवेगळ्या चर्चा आहे. फक्त आ. संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे बिनविरोध झाले, हीच काय ती पक्षाची जमेची बाजू.

काँग्रेसने चार जागा ठेवल्याच!

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटातून गतवेळी माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, करण ससाणे आणि अनुराधा नागवडे असे चार संचालक होते. पाचही वर्षे उपाध्यक्षपद माधवराव कानवडे यांच्याकडे कायम होते. या निवडणुकीतही त्यांनी चार जागा आपल्याकडे ठेवल्या. संगमनेर सोसायटीतून रणजितसिंह देशमुख, श्रीरामपुरातून करण ससाणे हे दोघे बिनविरोध झाले आहेत. भटक्या विमुक्तमधून गणपतराव सांगळे आणि महिला राखीवमधून संगीता जयंत वाघ हे थोरात यांच्या विचारांचे उमेदवार समजले जातात. यंदाही रणजितसिंह देशमुख यांचे नावाचे व्हा. चेअरमन म्हणून राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

भाजपला सर्वाधिक सात उमेदवार!

जिल्ह्यात विधानसभेचे चार आमदार आणि विधान परिषदेचे चार आमदार असलेला भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे. जिल्हा बँकेच्या जागावाटपातही प्रस्थापितांच्या पॅनलमध्ये भाजपचा वरचष्मा आहे. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, वैभव पिचड, बिपीन कोल्हे, आमदारत्रयी मोनिका राजळे, प्राजक्त तनपुरे व अक्षय कर्डिले, तसेच राहुल शिंदे असे सात उमेदवार भाजपचेच आहेत. श्रीगोंद्यातून दत्तात्रय पानसरे यांनी आपण डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत असल्याचे (तूर्त तरी) सांगितले आहे. पाच उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

अकोले, कर्जतमधील अपक्षांची खेळी काय?

अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांना प्रस्थापितांनी बाजूला ठेवले. ते विस्थापितांकडेही गेले नाहीत. अपक्ष सोसायटीतून ते उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात जर काँग्रेस-भाजपच्या नेतृत्वातील पॅनलचे चिन्ह घेऊन आपल्या मुलीने उमेदवारी केली, तर पक्षीय पातळीवर तक्रार होऊ शकते, हे सीताराम गायकर यांनी ओळखले. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पॅनल झाला असताना, अकोल्यात मात्र गायकर यांनी आपली मुलगी संजीवनी शिंदे यांना स्वतंत्र चिन्ह घेऊन अपक्ष उभे केले. आता लहामटेंना गायकरांची पक्षाकडे तक्रारही करता येणार नाही. असाच प्रकार, कर्जतमध्येही आहे. थोरातांसोबत गेलेल्या विखेंना टार्गेट करायचे असले तरी भाजपविरोधी गटात जाता येणार नाही, हे ओळखूनच विधान परिषद सभापती राम शिंदे विस्थापितांच्या गटात गेले नाहीत. परिणामी त्यांनी चार अपक्ष उमेदवार दिले. कर्जतमध्ये ज्योती शिंदे यांच्यासमोर प्रस्थापितांनी आपल्या पॅनलमधून तुषार पिसाळ यांना उमेदवारी दिली असती तर विखेंना जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण जायला वेळ लागला नसता. मात्र तुषार पिसाळ यांना प्रस्थापितांनी पॅनलमध्ये घेतले नाही. पिसाळ यांनीही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. तो कोणाच्या सांगण्यावरून घेतला, याविषयी मात्र वेगवेगळ्या चर्चा आहेतच. कर्जतमध्ये शिंदे यांच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार दिलेला नाही, तर जामखेडमध्ये शिंदेंचा उमेदवार सचिन घुमरे अपक्ष निवडून आणण्यासाठी विखेंनीच मदत केली आहे. त्यामुळे शिंदेंनाही पक्षीय पातळीवर तक्रारीला जागा उरली नाही.

बिपीनदादांच्या एन्ट्रीने चर्चा!

कोपरगाव सोसायटीतून विवेक कोल्हे हे पुन्हा एकदा बँकेत पोहचतील, असे वाटत होते. मात्र, ऐन वेळी त्यांनी स्वतः थांबण्याचा निर्णय घेतला. प्रस्थापितांच्या पॅनलमधून ज्येष्ठ नेते बिपीनदादा कोल्हे बँकेत बिनविरोध आले आहेत. विवेक कोल्हे यांच्याऐवजी सहकारातील अभ्यासू नेतृत्व असलेले बिपीनदादा यांच्या नावाचा निर्णय कसा आणि का झाला, याविषयीची ‘जर-तर’ची चर्चा होणारच आहे..!

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language