नगर: पतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पत्नीला न्यायालयाने एक महिना साध्या कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अहिल्यानगर सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासातून सादर करण्यात आलेले पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणी अजित नायडू यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी प्रियंका हिने पती अजित यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. त्यासाठी एका मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. या अकाउंटवरून फिर्यादीचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले होते.
त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सामाजिक बदनामी करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप होता. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांनी तांत्रिक तपास केला.
तपासादरम्यान आरोपी प्रियंका नायडू हिला ४ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी येथील प्रथम न्यायदंडाधिकारी वाय. एस. पैठणकर यांच्या न्यायालयात झाली.
सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अमित यादव, शेख आणि बाबर यांनी कामकाज पाहिले. वर्ग पोलिसांनी सादर केलेले तांत्रिक पुरावे आणि सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
त्यानुसार एक महिना साध्या कारावासाची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाच्या तपासात अंमलदार राहुल हुसळे आणि सविता खताळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Source: Pudhari News
