Hashtagintro

Ahilyanagar Reliance Smart Bazaar Robbery: अहिल्यानगरमध्ये रिलायन्स स्मार्ट बाजार फोडणारे दोघे जेरबंद; ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर: सावेडी परिसरातील रिलायन्स स्मार्ट बाजार फोडून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून रोख रकमेसह कार व दुचाकी असा ८ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जुन्या कामगाराचे चोरीचा डाव आखल्याचे तपासात पुढे आले.

विशाल अंशाबापू चेमटे (वय ३२, रा. मनोनिला नगर, बोल्हेगाव, ता. अहिल्यानगर), सुधीर दिनकर घोडके (वय ३९, रा. मातोश्री अपार्टमेंट, पवननगर, भिस्तबाग, सावेडी, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

सावेडी परिसरात ९ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी रिलायन्स स्मार्ट बाजारच्या सर्व्हर रूमच्या खिडकीचे गज कापून व काच फोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर कॅश रूममधील तिजोरी फोडून ४ लाख ६६ हजार ३९० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड, पोलिस अंमलदार संदीप पवार, शाहीद शेख, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांचे पथक आरोपींच्या शोधाकामी रवाना केले. १३ रोजी तांत्रिक तपासाआधारे पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल चेमटे हा दोन वर्षांपूर्वी रिलायन्स स्मार्ट बाजार येथे कामाला होता. त्यामुळे दुकानातील जमा होणारी रोख रक्कम नेमकी कोठे ठेवली जाते, याची त्याला पूर्ण माहिती होती. याच माहितीचा फायदा घेत त्याने साथीदार सुधीर घोडके याच्या मदतीने रेनॉल्ड क्विड कार व दुचाकीवर येवून स्मार्ट बाजारचे खिडकीचे गज कापून आतप्रवेश करून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून ४ लाख ४४ हजारांची रोकड, अलिशानकार, दुचाकी असा ८ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासाकामी आरोपींना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language