Hashtagintro

Alibaug Crime: पैसे दुप्पट करण्याचं आमिष; अलिबागच्या महिलेला ५ लाखांचा सायबर गंडा

पैसा दुप्पट करून देण्याच्या आमिषाला भुलून अलिबागमधील एका महिलेने तब्बल ५ लाख ३ हजार रुपये गमावल्याची घटना समोर आली आहे. परदेशातून भारतात यायचं आहे, त्यासाठी भारतीय चलन हवं आहे, असं सांगून सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप कॉलवरून महिलेशी संपर्क साधला. गोड बोलून विश्वास संपादन केला आणि टप्प्याटप्प्याने तिच्याकडून पैसे उकळले. हा प्रकार अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी आधी महिलेशी व्हॉट्सॲपवरून ओळख वाढवली. आपण परदेशात असून लवकरच भारतात येणार आहोत, असं सांगितलं. भारतात येण्यासाठी भारतीय रुपयांची गरज असल्याचं भासवलं. तुम्ही पैसे दिलेत तर ते दुप्पट करून परत देऊ, असं आश्वासनही दिलं.
या आमिषाला महिला बळी पडली. तिने वेगवेगळ्या वेळी ऑनलाइन पद्धतीने आणि बँक खात्याद्वारे एकूण ५ लाख ३ हजार रुपये आरोपींना पाठवले. मात्र पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी ठरलेली रक्कम परत केलीच नाही. उलट संपर्क टाळू लागले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (ड) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८ (४) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/24/suicide-attack-plot-in-delhi-ncr-foiled-ujjaid-arrested-from-meerut-suspected-of-having-links-with-a-pakistani-handler/
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियावरून पैशांची मागणी केली तर लगेच विश्वास ठेवू नका. पैसे दुप्पट करून देणं, परदेशातून भेटवस्तू किंवा मोठी रक्कम पाठवणं, कस्टम शुल्कासाठी पैसे भरण्यास सांगणं, हे सगळे सायबर फसवणुकीचे प्रकार असू शकतात. बँक खात्याची माहिती, एटीएम पिन, ओटीपी आणि यूपीआय पिन कोणालाही देऊ नका. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा आणि cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language