Hashtagintro

Arnab Cyclone : ‘अर्णब’ चक्रीवादळाचा आंध्र-ओडिशाला तडाखा, तिघांचा मृत्यू; एक लाखावर नागरिकांचे स्थलांतर

अमरावती/पुरी : आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीवर बुधवारी ‘अर्णब’ चक्रीवादळाने जोरदार धडक दिली. तासी १२५ ते १३५ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे किनारपट्टी भागाचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, ३१ घरांची पडझड झाली आहे. आंध्र प्रदेशातून ५७ हजार जणांचे, तर ओडिशात ३० हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ‘एनडीआरएफ’च्या ३८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथे अंगावर झाड कोसळल्याने चोक्का किशोर कुमार (वय ४६) यांचा मृत्यू झाला. तर, विशाखापट्टणम येथे शेतातील तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने एका ५३ वर्षीय व्यक्तीचा जीव गेला. तिसऱ्या घटनेत अनकापल्ली जिल्ह्यातील येल्लामंचिली येथे घराबाहेर पडलेल्या उघड्या विजेच्या तारेवर पाय पडल्याने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. भीमावरममध्येच विजेचा खांब मोपेडवर कोसळल्याने वृत्तपत्र वितरक रामबाबू गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) महानिरीक्षक नरेंद्रसिंह बुंदेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळाचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेशला बसला आहे. आंध्र प्रदेशातील पूरप्रवण भागातून सुमारे ५७,००० नागरिकांना तातडीने मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि अंदमान-निकोबार बेटांवर ‘एनडीआरएफ’च्या एकूण ३९ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे.

ओडिशामध्ये ‘रेड अलर्ट’; ३० हजार लोकांचे सुरक्षित स्थलांतर

चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडल्यानंतर कमकुवत झाले असले, तरी ओडिशाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. संभाव्य धोका ओळखून ओडिशा सरकारने ३०,००० हून अधिक लोकांना सखल आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागांतून सुरक्षित बाहेर काढले आहे.

ओडिशाचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की, मलकानगिरीसह दक्षिणेकडील जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. खबरदारी म्हणून १६ जिल्ह्यांमधील शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात २,०३७ चक्रीवादळ निवारा केंद्रे सज्ज ठेवण्यात आली असून, अन्‍न आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे. हवामान विभागाने नबरंगपूर, रायगडा, कोरापुट, मलकानगिरी, गजपती आणि गंजम जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

रेल्वे, विमानसेवेवर परिणाम

पूर्व किनारपट्टीवरून धावणाऱ्या ५० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी परिस्थितीचा आढावा घेत सांगितले की, झाडे पडल्यामुळे विस्कळीत झालेले रेल्वे ट्रॅक तातडीने पूर्ववत करण्यात आले आहेत. भुवनेश्वर विमानतळावरील व्यवहार बहुतांश सुरळीत असले, तरी काही मार्ग सुरक्षिततेसाठी रायपूरमार्गे वळवण्यात आले आहेत.

पश्चिम बंगालमध्येही पावसाचा इशारा

हवामान खात्याने ३१ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोलकाता, पूर्व व पश्चिम मेदिनीपूर, झाडग्राम आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने मच्‍छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

१) आंध्र प्रदेशात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे झाडे आणि विजेचे खांब कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून, ३१ घरांचे नुकसान झाले आहे.

२) खबरदारीचा उपाय म्हणून आंध्र प्रदेशातून सुमारे ५७,०००, तर ओडिशामधून ३०,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित छावण्यांमध्ये हलवण्यात आले.

३) १२५ ते १३५ कि.मी. प्रतितास वेगाने किनारपट्टी ओलांडल्यानंतर वादळ काही प्रमाणात कमकुवत होऊन छत्तीसगडच्या दिशेने सरकले आहे.

४) वादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील ५० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language