Hashtagintro

Bhandara Leopard Captured | १२ पिंजरे, तीन ड्रोन…; अखेर चिमुकल्याचा जीव घेणाऱ्या बिबट्याच्या मुसक्या आवळल्या

Leopard Sighting Bhandara

भंडारा : भंडारा तालुक्यातील तिर्री येथे घरात पाळण्यात शांतपणे झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याचा जीव घेणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद केले. मंगळवारी ( दि. १७) पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हल्ल्याच्या घटनास्थळापासून अवघ्या साडेतीनशे मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट अडकला. चार दिवसांपासून दहशतीखाली असलेल्या ग्रामस्थांनी यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

१३ नोव्हेंबरच्या रात्री पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले होते. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. त्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेतली. सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या नेतृत्वात सुमारे ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक गेल्या चार दिवसांपासून तिर्री व परिसरात तळ ठोकून होते.

बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात तब्बल १२ पिंजरे लावण्यात आले होते. तसेच तीन ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून जंगल व परिसराची पाहणी करण्यात येत होती. अखेर वन विभागाच्या या प्रयत्नांना यश आले. घटनास्थळापासून अवघ्या साडेतीनशे मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट अडकला.

जेरबंद करण्यात आलेला बिबट नर असून त्याचे वय अंदाजे १८ ते २० महिने आहे. बिबट पकडण्यात आला असला तरी वन विभागाचे पथक आणखी काही दिवस गावातच थांबणार आहे. या काळात ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांनी दिली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language