Chandrapur crime news:
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात एका पुरुषाचे कापलेले शीर आढळून आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळापासून काही अंतरावर रेल्वे उड्डाणपुलाखाली संबंधित व्यक्तीचे धडही आढळून आले. बुधवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. प्राथमिक परिस्थितीवरून हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
परिसरात एकच खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातील सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागील बाजूस एका पुरुषाचे शीर पडून असल्याचे आढळले. ही बाब नागरिकांच्या निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली.
श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकालाही पाचारण
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथकाच्या मदतीने पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता, काही अंतरावर रेल्वे उड्डाणपुलाखाली एका जाहिरात फलकाच्या खांबाजवळ संबंधित पुरुषाचे धड आढळून आले. शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने हा प्रकार अधिकच गंभीर बनला आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि सतत वर्दळ असलेल्या इंदिरा गांधी चौकात अशा प्रकारे मृतदेहाचे अवयव आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही
पोलिसांनी दोन्ही ठिकाणांचा पंचनामा करून घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्न
संबंधित व्यक्तीची अन्यत्र हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या किंवा मृतदेहाची ओळख लपविण्याच्या उद्देशाने शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले असावेत, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. फॉरेन्सिक तपास, शवविच्छेदन आणि पोलिसांच्या पुढील तपासातूनच या घटनेमागील नेमके गूढ उलगडणार आहे.
Source: Pudhari News
