Hashtagintro

Chandrapur Electricity Accident : विद्युत दुर्घटनेतील जखमी सुरक्षा कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

चंद्रपूर : वरोरा-भद्रावती मार्गावरील केसुरली रोड परिसरात कामादरम्यान ११ केव्ही उच्चदाब विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा महिनाभराच्या उपचारानंतर मृत्यू झाला. सुनील प्रल्हाद मेश्राम (वय ५२, रा. विकासनगर, वरोरा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, नागपूर येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

सुनील मेश्राम हे वरोरा येथील आनंदवन कॅम्प परिसरातील CMPTI येथे सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. १९ ऑक्टोबर रोजी भद्रावती तालुक्यातील केसुरली रोड परिसरात कोळशाच्या साठ्याच्या तपासणीसाठी ड्रिलिंगचे काम सुरू होते. याचदरम्यान त्यांच्यावर अन्य कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. काम सुरू असताना ट्रकचा उच्चदाब विद्युत तारांशी संपर्क आल्याने विद्युत दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मेश्राम गंभीररीत्या भाजले जाऊन जखमी झाले.

घटनेनंतर त्यांना तातडीने नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही महिनाभराच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. मेश्राम यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार हरवल्याने त्यांच्यासमोर आर्थिक आणि भावनिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यवस्थापनाने मेश्राम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; सखोल चौकशीची मागणी

या दुर्घटनेमुळे कामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त अन्य जबाबदाऱ्या सोपविताना आवश्यक सुरक्षा निकषांचे पालन केले जाते का? दुर्घटनास्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती का? तसेच संबंधित अधिकारी आणि पर्यवेक्षक घटनास्थळी उपस्थित होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

उच्चदाब विद्युत तारांमुळे घडलेल्या या दुर्घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सुरक्षेतील त्रुटी निश्चित कराव्यात, तसेच दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यासोबतच मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत आणि न्याय मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language