Hashtagintro

Chandwad Crime News | चांदवड शहरात मंडप साहित्य चोरीच्या वादातून धारदार शस्त्रांनी व्यावसायिकाचा निर्घृण खून

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
मंडपाचे साहित्य चोरल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन व्यावसायिक भावांवर धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या भावाने पलायनाने सुदैवाने तो बचावला. सुरेश नंदू खैर (४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि. २३) सकाळी ११ च्या सुमारास चांदवड शहरातील भैरवनाथ मंदिर परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी भास्कर नंदू खैर (३६) यांच्या फिर्यादीवरून संशयित किरण दगडू भोसले, राजू उर्फ अर्जुन दगडू भोसले, नीलम दगडू भोसले आणि शांती किरण भोसले (सर्व रा. चांदवड) या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. भैरवनाथ मंदिराजवळ सुरेश व भास्कर खैर हे दोन्ही भाऊ कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मंडप व्यवसाय आहे.

जवळच राहणाऱ्या दोन महिला मंडपाचे साहित्य चोरत असल्याचे खैर बंधूंच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या महिलांना जाब विचारला असता वाद झाला. नंतर सकाळी सुमारे ११ च्या सुमारास सुरेश व भास्कर खैर हे चोरीची विचारणा करण्यासाठी संबंधितांच्या झोपडीकडे गेले असता यावेळी किरण भोसले, राजू उर्फ अर्जुन भोसले, नीलम भोसले आणि शांती भोसले यांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला.

यात सुरेश खैर यांच्या मानेवर व छातीवर गंभीर वार झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी सुरेश खैर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट पसरली असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी तसेच बाहेरून होऊन वास्तव्यास असलेल्या नागरिकांबाबत योग्य ती कार्यवाहीची मागणी नागरिकांनी नगरपरिषद, पोलिस प्रशासन आणि वनविभागाकडे केली आहे.

मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने संशयितांना अटक केली. पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक भानुदास नन्हे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language