Hashtagintro

Chhath Puja 2026: मुंबई ते नंदुरबार.. महाराष्ट्रात छठपुजेचा उत्साह, डोंबिवलीत दुर्दैवी घटना, कुठं काय घडलं?

Chhath Puja 2026: मुंबई ते नंदुरबार.. महाराष्ट्रात छठपुजेचा उत्साह, डोंबिवलीत दुर्दैवी घटना, कुठं काय घडलं?

Maharashtra chhath puja 2026:  आज राज्यभरात छठपूजेचा उत्साह पाहायला मिळतोय. उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र सण असलेल्या छठपुजेसाठी  मुंबईसह नंदुरबार, ठाणे परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जुहू चौपाटीवर भेट देत भाविकांना शुभेच्छा दिल्या. एकीकडे राज्यात छठपुजेचा उत्साह पाहायला मिळत असतानाच डोंबिवलीमध्ये मात्र दुर्दैवी घटना घडली.

डोंबिवलीत छठपुजेच्या उत्सवाला गालबोट!

डोंबिवलीच्या दावडी तलावात छठपूजेदरम्यान 22 वर्षीय जुगनू कश्यप बुडाल्याची घटना घडली. कुटुंबासोबत तलावात उतरलेला जुगनू पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. होडीच्या मदतीने अडीच तासांपासून तरुणाचा शोध सुरू होता. आमदार राजेश मोरे यांनीही घटनास्थळी दाखल होत शोधमोहिमेचा आढावा घेतला.

चांदिवलीत छठपुजेचा उत्साह, आमदार दिलीप लांडेंची उपस्थिती

मुंबईच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातही छठपूजेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. शितल तलाव येथे मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधव एकत्र आले आणि पारंपरिक पद्धतीने छठपूजा साजरी केली. यावेळी आमदार दिलीप मामा लांडे यांचा उत्तर भारतीय पेहराव चर्चेचा विषय ठरला. हिंदू धर्मातील परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दरवर्षी रामनवमी, कावड यात्रा आणि छठपूजा असे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातील, अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप लांडे यांनी दिली.

दक्षिण काशीतही छठपुजेसाठी गर्दी

नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथेही छठपूजेचा उत्साह पाहायला मिळाला. तापी नदीच्या पवित्र तीरावर उत्तर भारतीय महिलांनी सूर्यदेव आणि छठी मैयाची विधिवत पूजा केली. नंदुरबार जिल्ह्यात उत्तर भारतीय नागरिकांची मोठी संख्या असल्याने प्रकाशा येथे या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

जांभोरी मैदानावर उत्तर भारतीयांची गर्दी

मुंबईतील वरळीच्या जांभोरी मैदानातही महापर्व छठपूजा समिती, वरळी यांच्या वतीने सूर्य षष्ठी महायज्ञ आणि छठपूजेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सूर्यदेवाची पूजा केली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून छठपूजेत सहभाग घेतला. यावेळी छठपूजा समितीच्या वतीने महापौरांचं स्वागत करण्यात आलं.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language