Hashtagintro

CM Devendra Fadnavis | व्होट चोरीचा आरोप करणाऱ्यांकडून संविधानाची चोरी

ठाणे : काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खरी लढाई ही भारत आणि संविधानासोबत आहे. याचा इतिहास पाहिला तर, १९७५ मध्ये दिवंगत इंदिरा गांधी यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली होती, तेव्हा न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द ठरवली होती. आज आम्हाला लोकशाहीचे धडे देणाऱ्या काँग्रेसने इंदिरा गांधींच्या कार्यकाळात काय झाले, याचा विचार केला पाहिजे. त्यावेळी संविधानाची मोडतोड करत न्यायालय आणि लोकशाहीला संपवण्याचे काम काँग्रेसने केले. आज व्‍होट चोरीचा आरोप करणाऱ्या याच लोकांनी प्रत्यक्षात संविधान चोरी केली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाण्यात भाजपच्या लोकशाही बचाव पदयात्रेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात ठाणे आणि नांदेड येथे भाजपच्या वतीने रविवारी (दि. १) लोकशाही बचाव पदयात्रा काढण्यात आली होती. नांदेड येथे भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत राज कॉर्नर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली महानगर पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचली. ठाण्यातील पदयात्रेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता इंदिरा गांधींचे नातू तेच जुने राजकारण घेऊन पुन्हा मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी कायम परदेशात फिरत असतात, ते कशासाठी जातात? भारताला नेहमी पाण्यात पाहण्याचे काम चीन करत असतो. मग राहुल गांधींच्या पक्षाला आणि त्यांच्या ट्रस्टला चीनकडून डोनेशन का मिळत आहे? चीनच्या पैशावर भारतामध्ये अराजकता पसरवण्याकरिताच काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुप्रीम कोर्टावर मोर्चे नेणे हीच अराजकता

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताच्या संविधानाने निर्माण केलेल्या सर्वोच्च न्यायालयावर हे लोक मोर्चे नेत आहेत, हीच खरी अराजकता आहे. सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढले जात असताना ‘संविधान वाचवा’ असे म्हणणारे गप्प का आहेत? यांना भारताची लोकशाही आणि संविधान नको आहे, त्यांना देशात अराजकता निर्माण करायची आहे. जनतेने त्यांचे हे षड्‍यंत्र समजून घेतले पाहिजे. चीनची ‘लाल व्यवस्था’ भारतात आणण्यासाठीच हा सर्व घाट घातला जात आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावरही उतरू शकतो.

काँग्रेसनेच गोठवले होते मूलभूत अधिकार

फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत भाषण करताना सांगितले होते की, या संविधानात सर्वात महत्त्वाचे काही असेल तर ते भारतीय नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार आहेत. मात्र, याच काँग्रेसने १९७६ मध्ये डॉ. आंबेडकरांनी दिलेले मूलभूत अधिकार गोठवून टाकले होते आणि मूलभूत अधिकारांसाठी कोणालाही सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही, अशी दडपशाही चालवली होती. पुढे १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर हे अधिकार देशवासीयांना पुन्हा परत देण्यात आले.

मोदींबद्दल अभद्र भाषा वापरणारे खड्ड्यात गेले : शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ज्या ज्या वेळी विरोधकांनी अभद्र भाषा वापरली, त्या त्या वेळी विरोधक खड्ड्यात गेले आहेत. देशातील जनतेला हे वर्तन अजिबात पटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे कलम ३७० हटवण्याचे आणि भव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पूर्ण केले. आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.

नागपुरात ५ नोव्हेंबरला अभियानाची सांगता

नागपूर : विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या कथित दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशव्यापी ‘लोकशाही वाचवा – अराजकता हटवा’ अभियान राबविण्यात येत आहे. २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत देशभरात विविध जनजागृती, संवाद, पदयात्रा, पत्रकार परिषदा आणि युवा सहभागाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाची सांगता ५ नोव्हेंबर रोजी नागपुरात भव्य पदयात्रेने होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language