
MGL hikes CNG Price: राज्यातील पुणे शहरातील CNG दरवाढीनंतर लगेचच दोन दिवसांनी मुंबईतील CNG ची दरवाढ केली आहे. आता मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) CNG महाग झाला आहे. यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक, तसेच कार मालकांना मोठा फटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने शनिवारी CNG चे दर 1.50 रुपये प्रति किलो वाढवले. ही दरवाढ लगेचच आज रविवार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. या वाढीसह, मुंबई महानगर क्षेत्र (MMR) आणि आसपासच्या परिसरामध्ये आता सीएनजी (CNG) ९१.५० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असेल. नेमके दर काय आहेत हे जाणून घेऊयात.
महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणांचे नवीन सीएनजी दर (प्रति किलो)
• मुंबई आणि परिसर (MGL): ₹९१.५० प्रति किलो (१.५० रुपयांची वाढ)
• पुणे: ₹९९.०० प्रति किलो
• नाशिक: ₹९९.७५ प्रति किलो
• नांदेड: ₹९७.२५ प्रति किलो
• सिंधुदुर्ग: ₹९४.०० प्रति किलो
११ महिन्यात सुमारे १४ टक्क्यांनी महाग CNG
या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात, सीएनजीची (CNG) किंमत ८०.५० रुपये प्रति किलो होती. ताज्या दरवाढीनंतर, एकूण वाढ ११ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सीएनजी सुमारे १४ टक्क्यांनी महाग झाले आहे. याचा थेट परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर, तसेच स्वतःच्या कारमध्ये इंधन म्हणून सीएनजी वापरणाऱ्यांवर होणार आहे. त्यांच्या इंधनावरील मासिक खर्चात वाढ होणार आहे.
एकाच वर्षात CNGच्या किमतीत ८ वेळा वाढ
एमजीएल (MGL) ने यावर्षी आतापर्यंत सीएनजीच्या किमतीत आठ वेळा वाढ केली आहे. जानेवारी महिन्यात ८०.५० रुपये प्रति किलो असलेली किंमत आता ९१.५० रुपयांवर पोहोचली आहे.
का वाढत आहे CNG चे दर?
MGL नुसार गॅस गॅस मिळवण्याच्या खर्चात वाढ झाल्यामुळे किमती वाढवाव्या लागल्या आहेत. कंपनीने स्पष्ट केले की, मध्यपूर्वेतील सुरू असलेले संकट, देशांतर्गत गॅस वाटपात झालेली घट आणि महागड्या आयातित गॅसवर वाढलेले अवलंबित्व यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, आयातित ‘री-गॅसिफाईड लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (RLNG) च्या वापराचे प्रमाण वाढले. वापराचे प्रमाण वाढल्यामुळे खरेदी खर्चावर विशेषतः सीएनजीच्या (CNG) बाबतीत, दबाव निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे याची किंमत आंतरराष्ट्रीय दरांशी जोडलेली असते. सीएनजीची मोठी मागणी हे देखील याचे एक कारण आहे.
Source: TV9 Marathi National
