
बंगालच्या उपसागरात भीषण अशा चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ‘अक्वान’ (Cyclone Akvan) चक्रीवादळ आता अधिक शक्तिशाली बनलं आहे. अक्वान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अक्वान चक्रीवादळामुळे दक्षिण भारताच्या किनारी भागांमध्ये वातावरण अधिक खराब होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळ अक्वान हे वीस नेव्हेंबर रोजी दुपारपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश, यानम आणि दक्षिण ओडिशा यांच्यामध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या दरम्यान हवेचा वेग हा प्रति तास तब्बल 90 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका जास्त असणार आहे. या काळात हवेचा वेग ताशी 110 किमी पर्यंत देखील जाऊ शकतो.
अक्वान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडणं धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे घराच्या बाहेर पडू नये, असा आवाहन हवामान विभागाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. एकीकडे दक्षिण भारतामध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असतानाच दुसरीकडे उत्तर भारतामध्ये मात्र कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये दाट धुकं पडणार असून, थंडीचा कडाका चांगलाच वाढणार असल्याचं देखील हवामान विभागाने म्हटलं आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार अक्वान पश्चिमोत्तर दिशेनं पुढे सरकत आहे. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी हे चक्रीवादळ मछलीपट्टनम आणि पुरीच्या समुद्र किनाऱ्याला पार करू शकतं. त्यानंतर हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
राज्यात 19 नोव्हेंबर रोजी वातावरण पूर्णपणे निरभ्र आणि कोरडं राहणार असून, दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भ, मराठवाड्यामध्ये थंडीचा कडका वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 20 नोव्हेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबई या भागात वातावरण कोरडं राहील, परंतु विदर्भात मात्र पावसाची शक्यता आहे.
Source: TV9 Marathi National
