Hashtagintro

Dharashiv Child Drowning| दिवाळीसाठी मामाच्या गावी आलेल्या चिमुकल्यावर काळाची झडप; पाण्याच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी अंत

उमरगा : दिवाळीनिमित्त मामाच्या गावी आलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्याच्या खड्ड्यात पडून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १७) सकाळीच्या सुमारास चिंचोली जहागीर (ता. उमरगा) येथे घडली. सौरभ सुरेश जमादार (वय ८) असे या बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील आणूर, (ता. आळंद, जि. गुलबर्गा) येथील सौरभ हा दिवाळीनिमित्त त्याचे मामा बाळू विठ्ठल ममाळे यांच्या चिंचोली जहागीर या गावी आला होता. मंगळवारी सकाळी तो इतर लहान मुलांसोबत खेळण्यासाठी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात गेला होता. खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंती जवळ असलेल्या पाण्याच्या खड्डयाजवळ गेला असता सौरभचा अचानक पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. खड्ड्यातील पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आनंदाने खेळणाऱ्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला. याप्रकरणी सुरेश जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय भंडारकवठे करीत आहेत.

शाळेच्या आवारात धोकादायक खड्डा!

शुद्ध पाणी प्रकल्पातील वाया जाणारे पाणी साठविण्यासाठी ग्रामपंचायतीने शाळेच्या संरक्षक भिंतीलगत प्लास्टिक अस्तरीकरण केलेला चार ते पाच फूट खोल खड्डा खोदला आहे. मात्र, हा खड्डा उघड्यावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा परिसरातील उघड्यावरील खड्डयामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर खेळताना किंवा ये-जा करताना एखादी दुर्घटना घडण्याची भीती असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी खड्डा सुरक्षित करणे आवश्यक आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language