Hashtagintro

Divale Gaon Bahiri Dev : अडीचशे वर्षांची परंपरा, तीन दिवसांचा उत्सव अन् वर्षभर समुद्रात वास्तव्य! दिवाळे गावच्या बहिरी देवाची अनोखी गाथा!

नवी मुंबई : नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात आजही गावाची संस्कृती आणि परंपरा जपणारे दिवाळे गाव आपली वेगळी ओळख टिकवून आहे. दिवाळीच्या निमित्ताने येथे बहिरी देवाचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे, तांडेल कुटुंबीयांकडून गेल्या अडीचशे ते तीनशे वर्षांपासून ही परंपरा जपली जात असून, सध्या तिसरी पिढी हा वारसा पुढे नेत आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, कुटुंबातील एका भक्ताच्या स्वप्नात देवाने दर्शन दिले आणि त्यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली. मात्र, वर्षातील बाराही महिने आपले वास्तव्य समुद्रातच राहील, अशी देवाची इच्छा असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
https://www.prahaar.in/2026/11/09/are-the-doors-of-bollywood-closed-due-to-husband-sameer-wankhedes-career-kranti-redkar-makes-a-sensational-revelation/
घारापुरी, माहुल आणि बेलापूर जेटीच्या परिसरातील खोल समुद्रात बहिरी देवाचे मूळ स्थान असल्याचे मानले जाते. त्यामुळे वर्षभर समुद्रात वास्तव्य करणाऱ्या या देवाला केवळ दिवाळीच्या चतुर्दशी, अमावस्या आणि बळीप्रतिपदा अशा तीन दिवसांसाठी किनाऱ्यावर आणले जाते. पहिल्या दिवशी वाजतगाजत देवाचे आगमन, दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा मूळ समुद्री स्थानी प्रस्थान, असा या उत्सवाचा क्रम असतो. विशेष म्हणजे, येथे देवाचे विसर्जन केले जात नाही, तर त्यांना त्यांच्या मूळ स्थानी पुन्हा विराजमान केले जाते. समुद्रातील मूर्ती शोधून बाहेर आणण्याची जबाबदारी पारंपरिक अनुभव असलेले चंद्रकांत देवकर आणि होडीचालक पार पाडतात.
बहिरी देवाला कोळी बांधवांचा रक्षणकर्ता मानले जाते. समुद्रात मासेमारी करताना नारायण सुखीर गजने यांच्यावर आलेले संकट आणि त्यांनी बहिरीनाथाचा धावा केल्यानंतर देवाने त्यांचे रक्षण केल्याची आख्यायिका आजही सांगितली जाते. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांची बहिरी देवावर विशेष श्रद्धा आहे. यंदाही मुलांसाठी नवस केलेल्या तसेच इतर मनोकामना पूर्ण झालेल्या अनेक भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवसपूर्तीचा आनंद, देवाप्रती कृतज्ञता आणि ग्रामस्थांची अढळ श्रद्धा या उत्सवातून पाहायला मिळत आहे.
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ तांडेल कुटुंबीयांचाच नव्हे, तर संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग असतो. रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईसह खारदांडा, वर्सोवा, करंजा अशा विविध भागांतून कोळी बांधव या उत्सवात सहभागी होतात. बहिरी देवाला समुद्रातून किनाऱ्यावर आणण्यासाठी आणि पुन्हा त्यांच्या मूळ स्थानी पोहोचवण्यासाठी जवळपास १०० ते १५० होड्या सहभागी होतात. विशेष म्हणजे, तरुण पिढीही तितक्याच उत्साहाने ही परंपरा पुढे नेत आहे.
यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असताना, चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे आणि राज्यात सुख-समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना बहिरी देवाच्या चरणी करण्यात येत आहे. आधुनिक नवी मुंबईच्या वेगवान जीवनशैलीतही समुद्राशी नातं जपणारी अडीचशे ते तीनशे वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, मात्र दिवाळी गावचा बहिरी देव आणि ग्रामस्थांची श्रद्धा आजही कायम आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language