Hashtagintro

Dr. Sharankumar Limbale : डॉ. लिंबाळे यांनी संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; खानापूर म. ए. समितीची मागणी

खानापूर : बेळगाव सीमाप्रश्नावरून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केल्याने १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्याविरोधात सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. सीमाप्रश्नाचा प्रदीर्घ इतिहास, मराठी भाषिकांचा संघर्ष आणि हुतात्म्यांचे बलिदान यांची जाणीव न ठेवता केलेल्या विधानाचा खानापूर तालुका म. ए. समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सीमाबांधवांच्या भावनांचा अवमान करणाऱ्या डॉ. लिंबाळे यांनी संमेलनाध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी समितीने केली आहे.

यासंदर्भात गुरुवार दि. २६ रोजी शिवस्मारक येथे समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर एका माध्यमाशी संवाद साधताना डॉ. लिंबाळे यांनी, बेळगाव काय पाकिस्तानात आहे का? बेळगाव भारतातच आहे. मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आणि तमिळनाडू, केरळमध्येही राहतो, म्हणून काय आपण संपूर्ण जग महाराष्ट्रात आणणार आहोत का, असे विधान केले होते. या वक्तव्याने सीमाप्रश्नाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सीमाभागातील मराठी जनतेच्या अस्मितेला धक्का बसला आहे.

गेल्या सात दशकांपासून सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात विलीन होण्याच्या मागणीसाठी संघर्ष करत आहेत. या लढ्यात अनेकांनी प्राणांची आहुती दिली, असंख्य कार्यकर्त्यांनी कारावास भोगला आणि पिढ्यान्‌पिढ्या मराठी अस्मिता जपण्यासाठी संघर्ष सुरू ठेवला. अशा ऐतिहासिक आंदोलनाची खिल्ली उडवणारे वक्तव्य करणे म्हणजे सीमाबांधवांच्या त्यागाचा अवमान असल्याची भावना माजी आमदार दिगंबर पाटील यांनी व्यक्त केली.

बैठकीत कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सचिव आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, विलास बेळगावकर, रुक्माणा झुंजवाडकर, मर्‍याप्पा पाटील, कृष्णा मन्नोळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language