Hashtagintro

ED Raid: रॉयल ट्विंकल, सिट्रसच्या ५५६ कोटींच्या मालमत्तांवर ईडीची टाच; गुंतवणूकदारांकडून ८,८५२ कोटी गोळा केल्याचा आरोप

मुंबई: हॉलिडे मेंबरशिप आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केल्याच्या कथित आर्थिक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी मोठी कारवाई केली.

रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड (RTSCL), सिट्रस चेक इन्स लिमिटेड (CCIL) आणि त्यांच्या संबंधित कंपन्यांच्या सुमारे ५५६.७२ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ईडीच्या मुंबई विभागाने तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली.

रॉयल ट्विंकल स्टार क्लब आणि सिट्रस चेक इन्स या कंपन्यांनी दीर्घकालीन हॉलिडे मेंबरशिप आणि गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित केले होते. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा आणि सुट्ट्यांसाठी विशेष सुविधा देण्याचे आश्वासन देत नागरिकांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.

मुंबईतील आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. संबंधित कंपन्यांकडून राबविण्यात आलेल्या योजना या भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची (सेबी) आवश्यक नोंदणी न घेता सामूहिक गुंतवणूक योजनांच्या स्वरूपात चालविण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.

नऊ वर्षांत ८,८५२ कोटींची वसुली

ईडीच्या तपासानुसार, १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत रॉयल ट्विंकल आणि सिट्रस चेक इन्स यांनी गुंतवणूकदारांकडून सुमारे ८,८५२ कोटी रुपये गोळा केले. यापैकी ३,४३० कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले, तर ३,०७७ कोटी रुपये एजंटना कमिशन म्हणून देण्यात आले. सुमारे १,७२३ कोटी रुपये कर्ज, आगाऊ रक्कम आणि अन्य आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून संबंधित व सहयोगी कंपन्यांकडे वळविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या कंपन्यांवर प्रवर्तक ओम प्रकाश गोयंका आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नियंत्रण असल्याचा ईडीचा दावा आहे. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेला निधी रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि अन्य व्यवसायांमध्ये गुंतविण्यात आल्याचा संशय आहे.

गुंतवणूकदारांना योजनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी एजंटचे मोठे जाळे कार्यरत होते. या एजंटनी नागरिकांकडून गुंतवणूक मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजावली. त्याबदल्यात त्यांना मोठ्या प्रमाणात कमिशन देण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्याच्या उद्देशाने ५५६.७२ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

नव्या गुंतवणूकदारांच्या पैशांतून जुन्यांची परतफेड

या कंपन्यांनी नव्या गुंतवणूकदारांकडून मिळणाऱ्या पैशांचा वापर आधीच्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी केल्याचा ईडीचा संशय आहे. ही पद्धत पाँझी योजनेप्रमाणे असल्याचे तपास यंत्रणेने नमूद केले आहे. या संपूर्ण आर्थिक व्यवहारांसाठी ८७ हून अधिक समूह कंपन्या, भागीदारी संस्था आणि संबंधित आस्थापनांचे जाळे वापरण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language