Hashtagintro

FDA Raids : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 35 टनांहून अधिक असुरक्षित अन्नसाठा जप्त

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घेतलेल्या राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक व कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यभरातून सुमारे 35.547 टन इतका भेसळयुक्त, निकृष्ट व नियमबाह्य अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ₹179.97 लाख इतकी आहे. अस्वच्छता आणि गंभीर नियमभंगाबद्दल मुंबईतील दोन आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागात धडक कारवाई: ₹65.80 लाखांहून अधिकचा साठा जप्त
या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात पाच वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून 32.639 टन अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, एकूण कारवाई ₹65.80 लाखांपेक्षा अधिक मूल्याची आहे.

हिंगोली (वसमत): सोमठाणा कुरुंदा येथील ‘वसमत अॅग्रो व्हेंचर्स इंडिया प्रा. लि.’ या हळद उत्पादक युनिटमध्ये गंभीर अस्वच्छता आढळली. कारखान्यात कबुतरांची विष्ठा, घरटी आणि संरक्षणाचा अभाव दिसून आला. या प्रकरणी 21,915 किलो साबुत हळद (किंमत ₹143,83,050) जप्त करून युनिट बंद करण्यात आले.
कन्नड (छत्रपती संभाजीनगर): ‘एस. एम. एजन्सी’ येथे केलेल्या तपासणीत 626 किलो मिरची व हळद पावडर (किंमत ₹12,96,380) जप्त करण्यात आली. स्वच्छतेचा अभाव आणि वैद्यकीय तपासणी नसल्याबद्दल ही कारवाई झाली.
परभणी (सेलू): ब्राह्मणगाव येथील ‘अभिनव फूड प्रॉडक्ट’ या हळद उत्पादक युनिटमध्ये उंदीर व कीटकांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता आढळल्याने 4,348 किलो हळद पावडर (किंमत ₹113,04,400) जप्त करून युनिटचा परवाना निलंबित करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर शहर: जाधववाडी परिसरातील ‘औरंगाबाद कोल्ड स्टोरेज’ विनापरवाना सुरू असल्याचे आढळल्याने सीलबंद करण्यात आले. तिथून 4,222 किलो गूळ, बडीशेप व शोफ असा एकूण ₹2,91,335 मूल्याचा साठा जप्त करण्यात आला.
नांदेड (देगलूर): एमआयडीसी खानापूर येथील ‘उमेश अग्रो इंडस्ट्रीज’ मधून भेसळीच्या संशयावरून 1,528 किलो रिफाइंड सोयाबीन तेल (किंमत ₹13,05,680) जप्त करण्यात आले.

https://www.prahaar.in/2026/10/22/maharashtra-fda-raids-konkan-nashik-sambhajinagar-licenses-suspended/
नाशिक विभाग: 2,908 किलो मसाले व ओवा जप्त
नाशिक विभागातही अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत दोन ठिकाणांहून ₹14.16 लाख मूल्याचा माल जप्त केला.

नाशिक: ‘सोमेश्वर घरगुती मसाले’ (द्वारका) येथे लेबलिंग नियमभंग व दुय्यम दर्जाच्या संशयावरून हळद, कांदा-लसूण मसाला, धने पावडर, गरम मसाला आणि काळा मसाल्यासह 2,230 किलो माल (किंमत ₹111,86,200) जप्त करण्यात आला.
जळगाव: दाणा बाजार परिसरातील ‘विपुल एंटरप्रायजेस’मधून चुकीच्या लेबलिंगचा 678 किलो ओवा (किंमत ₹12,30,520) जप्त करण्यात आला.

मुंबईत दोन आस्थापनांचे परवाने निलंबित
हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनमध्ये किचनमधील अस्वच्छता, गंजलेले रॅक, शिळे अन्न ताज्या अन्नात मिसळणे, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे तसेच अनधिकृत खाद्यरंगांचा वापर यांसारखे गंभीर नियमभंग आढळल्याने मुंबईतील खालील दोन ठिकाणचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत:

बेस्ट कॅन्टीन (Best Canteen): बोरीवली पश्चिम, साई आश्रम बस स्टॉप, एलआयसी कॉलनी, बृहन्मुंबई.
इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Instakart Services Private Limited): भांडुप पश्चिम.

अन्न सुरक्षेचे निकष न पाळणाऱ्या उत्पादक व विक्रेत्यांवर प्रशासनाकडून यापुढेही अशीच कडक मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language