Hashtagintro

Gadchiroli News| आलापल्ली–सिरोंचा महामार्गाच्या कामात अनियमिततेचा आरोप

गडचिरोली : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीच्या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या सहा वर्षांपासून या महामार्गाचे काम अपूर्ण असून, राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी बांधकामातील कथित तांत्रिक अनियमिततांबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

या पाहणी दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयाचे अधीक्षक अभियंता असाटी, गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर, उपविभागीय अभियंता बोबडे तसेच संबंधित कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

ताटीकोंडावार यांनी महामार्गाच्या कामातील विविध तांत्रिक त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा केला. जुन्या डांबरीकरणाचा थर काढल्यानंतर नियमानुसार आवश्यक असलेला ३०० मिलिमीटर मुरुमाचा थर न देता थेट जीएसबी (ग्रॅन्युलर सब-बेस) टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच साइड बर्मच्या कामात योग्य पद्धतीने मुरूम वापरण्याऐवजी रस्त्यावरील मलब्याचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाईप कल्व्हर्टच्या बांधकामात आवश्यक बेड काँक्रीट न करणे आणि त्यावर जीएसबीऐवजी थेट माती टाकून भराव करण्यात येत असल्याचे मुद्देही त्यांनी उपस्थित केले. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी संबंधित अभियंते आणि थर्ड पार्टी कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी नियमित उपस्थित राहत नसल्याने कंत्राटदाराच्या कामावर पुरेसे नियंत्रण नसल्याचा आरोपही करण्यात आला.

रात्रीच्या पाहणीवरूनही नाराजी

जुलै महिन्यात वरिष्ठ अभियंता नवले यांनी महामार्गाची पाहणी केली होती. मात्र, त्यानंतरही कामात अपेक्षित प्रगती झाली नसल्याचा दावा ताटीकोंडावार यांनी केला. ऑक्टोबरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी पाहणी केल्याने रस्त्याच्या प्रत्यक्ष गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन झाले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

महामार्गावरील खड्डे आणि धुळीमुळे दुचाकीस्वार, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्ण कामामुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकामातील कथित अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी; अन्यथा परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ताटीकोंडावार यांनी दिला आहे. दरम्यान, बांधकामातील या आरोपांबाबत संबंधित विभागाची अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्याने चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language