Hashtagintro

Gadhinglaj Protest : गडहिंग्लज आंदोलनाला हिंसक वळण

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मंगळवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता गृहीत धरून आंदोलक आनंद व्यक्त करण्याच्या मनःस्थितीत होते; मात्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी थेट शिल्लक असलेल्या गावांचा सर्व्हे करून मगच दुष्काळी तालुक्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात घेणार असल्याचे सांगताच आंदोलकांचा चांगलाच भडका उडाला. संतप्त झालेल्या आंदोलकांनी दसरा चौकात थेट टायर पेटवून सरकारचा निषेध व्यक्त करत वाहतूक रोखून धरली.

मंगळवारी राज्य सरकारचा याबाबतच अंतिम निर्णय सकारात्मक येणार असल्याचे सांगण्यात आल्याने आज आंदोलकांनी अन्य कोणतेही आंदोलन घेतले नव्हते. साहजिकच पोलिस यंत्रणाही सुटकेचा निःश्वास सोडून होती; मात्र अचानक आंदोलक संतप्त होऊन थेट रस्त्यावर टायर पेटवत असल्याचे कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, पोलिस निरीक्षक सतीश होडगर हे उपलब्ध पोलिस संख्याबळासह घटनास्थळी दाखल झाले.

दुष्काळी तालुक्यांच्या यादीत गडहिंग्लजचा समावेश नसल्याने आंदोलक प्रचंड संतप्त झाल्याने ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. रस्त्यावर टायर पेटवून वाहतूक रोखल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यालाही काही काळ विरोध झाला. पेटवलेल्या टायर विझवून आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्याच्या समोरही संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणीही मनोगतातून सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गडहिंग्लजमधील आणखी कार्यकर्ते पोलिस ठाण्यासमोर जमा झाले होते.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language