Hashtagintro

Ganpatipule News| गणपतीपुळे किनाऱ्यावरील संरक्षण भिंत भग्नावस्थेत!

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील शासकीय विश्रामगृहासमोरील संरक्षण भिंतीचा काही भाग समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने कोसळला असून, हा भग्नावस्थेतील भाग पर्यटकांसाठी अडथळा ठरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना समुद्रकिनाऱ्यावर उतरताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून या भिंतीची पडझड सुरू असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ आणि पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याचे निसर्गसौंदर्य न्याहाळता यावे, पर्यटकांना पायऱ्यांवर बसून अथांग समुद्राचा आनंद घेता यावा तसेच सायंकाळचा नयनरम्य सूर्यास्त पाहता यावा, या उद्देशाने मेरीटाईम बोर्ड अर्थात बंदर खात्यामार्फत सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पायऱ्यांची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. या भिंतीचा पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर उतरण्यासाठीही मोठा उपयोग होत होता. शासकीय विश्रामगृहापासून मंदिराच्या दिशेने चौपाटीवर जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरत होता.मात्र, पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे आणि जोरदार लाटांच्या माऱ्यामुळे संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला आहे.

गेल्या चार-पाच वर्षांत या भिंतीची स्थिती अधिकच खराब झाली असून, सध्या तुटलेल्या भागातून ये-जा करताना पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.गणपतीपुळे येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. अशा महत्त्वाच्या पर्यटनस्थळावरील पायाभूत सुविधांची दुरवस्था पर्यटनाच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची तातडीने पाहणी करून संरक्षण भिंतीच्या तुटलेल्या भागाची दुरुस्ती करावी किंवा आवश्यकतेनुसार नव्याने बांधकाम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून होत आहे. पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी आता तरी बंदर खात्याने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language