Hashtagintro

Gautami Patil : माफी मागूनही ट्रोलिंग थांबेना ! गौतमी पाटील जुन्या व्हिडीओबद्दल स्पष्टच बोलली; माधुरी दीक्षितने एका वाक्यात संपवला विषय

Gautami Patil : माफी मागूनही ट्रोलिंग थांबेना ! गौतमी पाटील जुन्या व्हिडीओबद्दल स्पष्टच बोलली; माधुरी दीक्षितने एका वाक्यात संपवला विषय

‘कौन बनेगा करोडपती’ या हिंदी शोच्या धर्तीवर सुरू झालेल्या ‘कोण होणार करोडपती’ या मराठी क्विझ शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या शोचा 5 वा सीझन सुरू असून, बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित या शोचं सूत्रसंचालन करत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता नृत्यांगना आणि कलाकार गौतमी पाटील या शोमध्ये सहभागी झाली होती. तिच्यासोबत बिग बॉसचा विजेता आणि अभिनेता शिव पाटीलही दिसणार आहे. या दोघांचा आगामी एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून गौतमी आणि शिव हॉटसीटवर बसून गेम खेलताना दिसतील.

या शोदरम्यान गप्पा मारताना, नृत्यांगना गौतमी पाटीलने तिच्या आयुष्यातील एका जुन्या वादावर भाष्य केलं. तिचा व्हायरल झालेला व्हिडीओ, त्यानंतर झालेलं ट्रोलिंग आणि सार्वजनिकरीत्या माफी मागूनही सुरू राहिलेली टीका, याबाबत तिने मनमोकळेपणाने आपली बाजू मांडली. जुन्या व्हिडीओमुळे आजही आपल्याला टीकेचा सामना करावा लागत असल्याची खंतही तिने व्यक्त केली.

व्हायरल व्हिडीओबाबत काय म्हणाली गौतमी पाटील ?

आपल्या जुन्या वादाबद्दल बोलताना गौतमीने सांगितलं की, ती एका कार्यक्रमात नृत्य सादर करत होती. त्याचदरम्यान तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कार्यक्रम संपवून घरी परतत असताना तिला या प्रकरणाबद्दल समजलं.  गौतमी म्हणाली की, घरी जात असताना नेमकं काय घडलं आहे, हे मला समजलं. त्यानंतर मी तातडीने आपलं स्पष्टीकरण दिलं आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली. तिच्या म्हणण्यानुसार, जे घडलं ते अनवधानाने झालं होतं; मात्र गौतमीने त्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी मेहनत घेतली आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतल्याचं गौतमीने नमूद केलं,

माझं आजचं काम पाहा आणि मग माझ्याबद्दल बोला

जुन्या व्हिडीओमुळे आपली प्रतिमा अजूनही त्याच गोष्टीशी जोडली जात असल्याची खंत गौतमीने व्यक्त केली. ती म्हणाली की, एखाद्या व्यक्तीवर एकदा एखादा शिक्का बसला की, त्यातून बाहेर पडणं खूप कठीण असतं. आज आपण चांगलं काम करत असलो, तरी लोक जुन्या व्हिडीओंचीच चर्चा करतात. त्यामुळे आपण अजूनही पूर्वीसारखंच काम करत आहोत, असा समज निर्माण होतो. मात्र, आपल्यात बदल झाला असून आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचं गौतमीने स्पष्ट केलं.

ती पुढे म्हणाली, “तुम्हाला अजूनही वाटत असेल की मी त्याच चुका करत आहे, तर माझा कोणताही शो पाहायला या. माझं काम पाहा आणि त्यात काही चुकीचं वाटलं, तर जरूर सांगा. मला न्याय देण्याआधी लोकांनी माझं आजचं काम पाहावं, एवढीच माझी इच्छा आहे.”

गौतमीच्या शोमध्ये आता महिलांचीही वाढली संख्या

या संवादादरम्यान गौतमीने तिच्या कार्यक्रमांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दलही सांगितलं. पूर्वी तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना पुरुष प्रेक्षकांची संख्या अधिक असायची; मात्र आता महिला प्रेक्षकांची संख्याही वाढत असल्याचं तिने नमूद केलं. गौतमीचं म्हणणं ऐकल्यानंतर माधुरी दीक्षितनेही तिची बाजू समजून घेत प्रतिक्रिया दिली. एखादी व्यक्ती आपली चूक मान्य करते आणि ती सुधारण्यासाठी प्रयत्न करते, तर त्यानंतरही तिला सतत त्याच गोष्टीवरून दोष देण्यात काय अर्थ आहे, असा आशय माधुरीच्या प्रतिक्रियेतून व्यक्त झाला.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language