Hashtagintro

Goa development works begin in Kule |कुळेच्या विकासासाठी ७.५ कोटींची कामे सुरू

कुळे : कुळे-शिगाव पंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ७.५ कोटींची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी बंधाऱ्यांमधून पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पक्क्या कालव्यांची बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच दूधसागर धबधबा हे उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पंचायत क्षेत्रातील देवालयांचा परिसरही सुशोभीत करण्यात येणार आहे, असे सभापती गणेश गावकर यांनी सांगितले.

कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रात चार ठिकाणी एकूण ७.५ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांची पायाभरणी व उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त पंचायत प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नवावाडा-कुळे येथील १.५ किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्याचे १.५ कोटी रुपये खर्चुन हॉटमिक्स डांबरीकरण व गटार बांधकाम करण्यात येणार आहे. वाशिमड-शिगाव येथे पंचायत व आत्मनिर्भर भारत निधीतून ५५ लाख रुपये खर्चुन सभागृह उभारण्यात येणार आहे. गांधीनगर-भरिपवाडा येथील रस्त्याचे डांबरीकरण व गटार बांधकामासाठी १.५ कोटी रुपये, तर सोझामळ-कुळे येथील अंतर्गत रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण व गटार बांधकामासाठी २.५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

सभापती गावकर म्हणाले, पंचायत क्षेत्रात आतापर्यंत अनेक विकासकामे झाली आहेत. सोझामळ येथील एका प्रभागात गेल्या पाच वर्षांत १५ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. देवालयांच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रस्ताव तयार करून द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

सरपंच बबन गावकर यांनी गणेश गावकर हे दूरदृष्टी असलेले नेते असून भविष्यात उपयुक्त ठरणारी विकासकामे त्यांनी केली आहेत, असे सांगितले. सरपंच गोविंद शिगावकर यांनी सोझामळ, नवावाडा व गांधीनगर येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून, कुळेतील अन्य प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांची कामेही लवकरच सुरू होतील, असे सांगितले. बाजारपेठेत सुमारे १० कोटी रुपये खर्चाचे मार्केट कॉम्प्लेक्स उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बेनी आझावेदो यांनी मेटावाडा भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून हिंदू स्मशानभूमीचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. उपसरपंच नेहा मडकईकर यांनी सोझामळ भागात गेल्या पाच वर्षांत अनेक विकासकामे झाल्याचे नमूद केले. पंच अजय बांदेकर यांनी गावातील विविध क्षेत्रांत विकासकामे झाल्याचे सांगितले. पंच प्रसाद गावकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पंच अनिकेत देसाई यांनी केले.

कुळे गाव स्मार्ट बनविणार : देसाई

जिल्हा पंचायत सदस्य रूपेश देसाई यांनी गावाचा विकास कसा करावा, हे गणेश गावकर यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. कुळे गाव स्मार्ट गाव बनविण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. प्रत्येक पंचायत क्षेत्रातील तीन देवालयांचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language