Hashtagintro

Gokul Dairy | ‘गोकुळ’च्या पहिल्याच बैठकीत खुर्च्यांवरून खडाजंगी

कोल्हापूर : गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत खुर्च्यांच्या बैठक व्यवस्थेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संचालकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. संचालकांना बसण्यासाठी केलेल्या व्यवस्थेवरून सुरू झालेला वाद काही काळ रंगला. अखेर अध्यक्ष राजेश पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आणि वादावर पडदा पडला.

अध्यक्ष राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्‍य कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीस सर्व संचालक उपस्थित होते. बैठकीसाठी समविचारी आघाडीचे संचालक बाबासाहेब चौगले आले असता, त्यांनी आपल्या आघाडीच्या संचालकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था कशी केली आहे, याची विचारणा केली. त्यावेळी आघाडीच्या संचालकांसाठी खुर्च्या वेगवेगळ्या ठिकाणी लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आपल्या आघाडीच्या सर्व संचालकांसाठी एकाच ठिकाणी खुर्च्या लावाव्यात, समोरासमोर खुर्च्या लावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावर महायुतीचे संचालक अंबरीश घाटगे यांनी आक्षेप घेतला. ‘आम्ही मागील पाच वर्षे अशाच पद्धतीने बैठकांना बसलो होतो. आम्ही बसलो, तुम्हाला काय अडचण आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर बाबासाहेब चौगले यांनी, ‘आपण समोरासमोर बसूया, उगाच गोंधळ नको,’ अशी भूमिका मांडली. दरम्यान, संचालक चेतन नरके यांनीही या चर्चेत हस्तक्षेप केला. ‘पाच वर्षे आम्हाला पुढे काय सुरू आहे, याचा आवाजही व्यवस्थित ऐकू येत नव्हता. आम्ही अशी पाच वर्षे काढली आहेत,’ असे सांगत त्यांनी यापूर्वीच्या बैठक व्यवस्थेबाबत आपली भूमिका मांडली. या शाब्दिक वादात अध्यक्ष राजेश पाटील यांनाही मध्यस्थी करावी लागली. अखेर संचालकांच्या मागणीनुसार खुर्च्यांची बैठक व्यवस्था बदलण्यात आली. त्यानंतर संचालकांमधील वाद शांत झाला.

बंटी पाटील यांचे आभार; पण त्यांनी अजून अभिनंदन केले नाही

बैठकीनंतर माध्‍यमांशी बोलताना अध्‍यक्ष राजेश पाटील म्हणाले, समविचारी आघाडीचे नेते बंटी पाटील यांनी आपल्या आघाडीच्या सर्व १३ संचालकांना बैठकीला पाठवले होते. या संचालकांनी सहकार्याची भूमिका घेतली. त्याबद्दल बंटी पाटील यांचे आभार मानतो. मात्र, मी अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अद्याप माझे अभिनंदन केलेले नाही.

सर्वसाधारण सभेसाठी मुदतवाढ मागणार

नुकतीच निवडणूक झाल्यामुळे सर्व संचालकांना कामकाजाची माहिती घ्यावी लागणार आहे. तसेच ताळेबंद समजून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा घेण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती अध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language