Gokul Dairy Chairman Election Rajesh Patil: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली आहे. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून, चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुळेकर यांचा पराभव केला.
राजेश पाटील यांना 16 मते, तर शशिकांत पाटील यांना 13 मते मिळाली. निवडीनंतर राजेश पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देताना चंदगड तालुक्याला 63 वर्षांनंतर गोकुळच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
‘63 वर्षांनंतर चंदगडला प्रतिनिधित्व मिळाले’
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश पाटील यांनी महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे, संचालकांचे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “63 वर्षांनंतर चंदगडसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागाला गोकुळच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळाले आहे. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जिल्ह्यातील महत्त्वाच्या दूध संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेत्यांचेही त्यांनी आभार मानले.
‘गोकुळचा तोटा भरून काढण्याला प्राधान्य’
गोकुळ दूध संघाच्या आर्थिक स्थितीबाबतही राजेश पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले. गेल्या वर्षभरात झालेला तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित, संस्थेची आर्थिक प्रगती आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, “गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. या संस्थेचे वैभव वाढवण्यासाठी मी सर्व संचालकांना सोबत घेऊन काम करणार आहे. गोकुळला राज्यात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यासोबतच देशपातळीवरही अधिक चांगले स्थान मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल. गेल्या वर्षभरात झालेला तोटा कसा भरून काढता येईल, यावरही लक्ष केंद्रित केले जाईल.”
विरोधकांनाही एकत्र येण्याचे आवाहन
निवडणुकीदरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, आता निवडणूक संपली असून राजकारण बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे, असे राजेश पाटील यांनी म्हटले. विरोधी आघाडीच्या नेत्यांनाही त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.
“निवडणुका संपल्या आहेत. आता अध्यक्षपदाची निवडही झाली आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे. जे काही झाले ते विसरून आपण सर्वांनी एकदिलाने काम करूया. विरोधकांनीही गोकुळच्या विकासासाठी हातात हात घालून पुढे यावे. आगामी काळात सर्वांनी एकत्र येऊन दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करावे, अशी माझी अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
चंदगड, आजरा आणि गडहिंग्लजच्या दूध उत्पादकांसाठी विशेष प्रयत्न
चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या भागातून गोकुळला चांगल्या प्रतीचे दूध पुरवले जाते. त्यामुळे या भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, असेही राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या उभारणीत माजी नेत्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांनी दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर, आपले वडील नरसिंग गुरुनाथ पाटील आणि दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्याची आठवण काढली. या नेत्यांनी सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला बळ दिले. हे काम पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजेश पाटील यांच्या निवडीमुळे गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता आली आहे. चंदगड तालुक्याला तब्बल 63 वर्षांनंतर अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता गोकुळचा कारभार, संस्थेची आर्थिक स्थिती आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर नवे अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Source: Pudhari News
