Hashtagintro

Gold Treasure Discovery | मजुराला सापडला ९९ कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना

लंडन : बेल्जियममधून एक अत्यंत रंजक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे, जिथे एका जुन्या इमारतीचे नूतनीकरण आणि ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना मजुराला तब्बल ९९ कोटी रुपयांचे (सुमारे ९ दशलक्ष युरो) सोने सापडले आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्टस्‌नुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत कामावर असलेला एक १८ वर्षांचा तरुण ‘कोबे’ आणि त्याचे इतर मजूर साथीदार एका इमारतीच्या तळघराची आणि ड्रेनेज लाईनसाठी पायाची खोदाई करत होते. त्याच दरम्यान त्यांना तळघराच्या भिंतीच्या विटांमध्ये एक बॅग लपवून ठेवल्याचे आढळले. सुरुवातीला त्यांना तिथे काही सर्वसामान्य नाणी असावीत असे वाटले; परंतु जेव्हा त्यांना सोन्याची वीट दिसायला लागली, तेव्हा तिथे सोन्याचा मोठा खजिना लपवला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या खजिन्यामध्ये तब्बल ४९ सोन्याच्या विटा आणि सुमारे १,००० मौल्यवान सोन्याची नाणी आढळून आली आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या संपूर्ण खजिन्याची किंमत अंदाजे ९९ कोटी रुपये (९ दशलक्ष युरो) असल्याचे सांगितले जात आहे. इमारतीच्या इतिहासानुसार, १९ व्या शतकाच्या शेवटी ही वास्तू एका श्रीमंत वाईन उत्पादक कुटुंबाशी (व्हॅन एशे कुटुंब) संबंधित होती. सध्या ही मालमत्ता एका सामाजिक कल्याणकारी (चॅरिटी) संस्थेच्या मालकीची आहे. मात्र, इतके मोठे सोने तिथे कसे आले आणि त्याचा खरा मालक कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सध्या पोलिस आणि स्थानिक प्रशासन कसून चौकशी करत आहेत.

बेल्जियमच्या कायद्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर मालकाला किंवा वारसांना आपला दावा करण्यासाठी ५ वर्षांचा (२०३१ पर्यंत) काळ दिला जातो. जर ठरलेल्या मुदतीत कोणताही वैध मालक समोर आला नाही आणि हे सोने कोणत्याही बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्याशी जोडलेले नसल्याचे सिद्ध झाले, तर हा खजिना तो शोधणारे मजूर आणि त्या मालमत्तेची मालक असलेली संस्था यांच्यामध्ये नियमांनुसार वाटून दिला जाऊ शकतो. मजुरांनी प्रामाणिकपणा दाखवत हा संपूर्ण खजिना स्वतःकडे लपवून न ठेवता तत्काळ पोलिसांच्या हवाली केला असून, त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language