हट्टा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती वीज वापर कमी असतानाही अनेक ग्राहकांना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक रकमेची बिले मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असताना वीज बिलांच्या वाढत्या रकमेने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. काही ग्राहकांचे म्हणणे आहे की, मागील महिन्याच्या तुलनेत यंदा वीज बिलामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नेमका वीज वापर किती झाला, मीटर रीडिंग योग्य घेतले का आणि बिलाची रक्कम कशाच्या आधारे आकारण्यात आली, असे प्रश्न ग्राहक उपस्थित करत आहेत.
वीज बिलामध्ये अचानक वाढ झाल्याने अनेक ग्राहक महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे समाधान होणे आवश्यक आहे. महावितरणने प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलाची योग्य तपासणी करावी, मीटर रीडिंगमध्ये पारदर्शकता ठेवावी तसेच चुकीची किंवा अवाजवी बिले आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. वाढीव वीज बिलांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Source: Pudhari News