Hashtagintro

IFFI 2026 : इफ्फीमध्ये सात दिग्गजांच्या जन्मशताब्दीचा भव्य सन्मान

भारत शिंदे

पणजी : भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या सात दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी २०२६) त्यांना विशेष मानवंदना देण्यात येणार आहे. उत्तम कुमार, शक्ती सामंत, ओ. पी. नय्यर, सूर्यकांत मांढरे, प्रेम नझीर, राज कुमार आणि बॉम्बे रवी या सात दिग्गजांचा जन्म १९२६ मध्ये झाला होता. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हिंदी, बंगाली, मल्याळम आणि मराठी या चार भाषांतील पाच पुनर्स्थापित चित्रपटांचे विशेष प्रदर्शन महोत्सवात होणार आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) या चित्रपटांचे पुनरुज्जीवन केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील या महान कलाकारांच्या योगदानाची नव्या पिढीला ओळख करून देण्याबरोबरच देशाचा समृद्ध चित्रपट वारसा जतन करण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सात दिग्गज, सात प्रेरणादायी कारकीर्दी

उत्तम कुमार : १९४८ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या उत्तम कुमार यांनी २०० हून अधिक चित्रपटांत काम केले. बंगाली चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. १९६५ मधील ‘चौरंगी’ या चित्रपटात त्यांनी सत्यसुंदर साता बोस यांची भूमिका साकारली होती.

शक्ती सामंत आणि ओ. पी. नय्यर : ‘काश्मीर की कली’ या गाजलेल्या चित्रपटामुळे शक्ती सामंत आणि संगीतकार ओ. पी. नय्यर या दोघांच्याही कारकिर्दीला मोठी उंची मिळाली. शक्ती सामंत यांनी १९५५ मध्ये ‘बहू’ या चित्रपटाद्वारे स्वतंत्र दिग्दर्शनाला सुरुवात केली. हिंदी आणि बंगाली मिळून त्यांनी ४३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. दुसरीकडे, ओ. पी. नय्यर यांनी १९५२ मधील ‘आसमान’ या चित्रपटापासून संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली. मोहम्मद रफी, आशा भोसले आणि गीता दत्त यांच्या आवाजातील अनेक अजरामर गीतांना त्यांनी संगीत दिले.

सूर्यकांत मांढरे : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त सूर्यकांत मांढरे यांनी भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. शंभरहून अधिक चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. १९६५ मधील ‘साधी माणसं’ या चित्रपटातील शंकर लोहार ही त्यांची भूमिका विशेष गाजली. या चित्रपटाला लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या टोपणनावाने संगीत दिले होते.

प्रेम नझीर : मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रेम नझीर यांनी ७०० हून अधिक चित्रपटांत प्रमुख भूमिका साकारल्या. ‘तुलाभारम’ या चित्रपटातील कामगार नेते राम यांची संयत भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. अभिनेत्री शीला यांच्यासोबत १३० चित्रपटांत काम करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या नावावर अभिनयाशी संबंधित दोन गिनीज विश्वविक्रम असून, १९८३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज कुमार आणि बॉम्बे रवी : ‘वक्त’ या चित्रपटातील राज कुमार यांची राजा ही भूमिका आणि बॉम्बे रवी यांनी संगीतबद्ध केलेले ‘ए मेरी जोहरा जबीं’ हे गीत आजही रसिकांच्या स्मरणात आहे. राज कुमार यांनी १९५२ मधील ‘रंगीली’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि पुढे अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. संगीतकार बॉम्बे रवी यांनी १९५५ मधील ‘वचन’ या चित्रपटापासून संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली. ‘परिणयम’ आणि ‘सुकृतम’ या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

या विशेष चित्रपट प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीतील सात दिग्गजांच्या कलात्मक योगदानाला उजाळा मिळणार आहे. त्याचबरोबर जुन्या चित्रपटांचे पुनर्स्थापित स्वरूपात जतन करून हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही इफ्फीच्या माध्यमातून केला जात आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language