Hashtagintro

India China Border Clash | अरुणाचल सीमेवर भारत-चीन सैन्यात अजूनही धुमश्चक्री सुरू

अल्वर / नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यात अजूनही तणावपूर्ण परिस्थिती असून अनेक ठिकाणी दोन्ही सैन्यांमध्ये थेट संघर्ष सुरू आहे, असा अत्यंत महत्त्वाचा खुलासा भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे (आयटीबीपी) महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी केला आहे.

राजस्थानमधील अल्वर येथे ‘हिमवीर’ जवानांना संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. अरुणाचल सीमेवरील संघर्षाबाबत सुरक्षा यंत्रणेकडून दिलेली ही पहिलीच अधिकृत कबुली मानली जात आहे. ते म्हणाले, अरुणाचलमध्ये अनेक संवेदनशील ठिकाणी दोन्ही सैन्यांमध्ये नुकत्याच चकमकी झाल्या आणि ही स्थिती आजही कायम आहे. मात्र, या कठीण काळात आयटीबीपीच्या ‘शौर्य कमांडो’ तुकड्यांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे.

या आव्हानांना तोंड देण्यासाठी आयटीबीपी आपल्या रणनीतीत मोठे बदल करत आहे. गलवान खोऱ्यासारख्या संभाव्य हिंसक चकमकींना सामोरे जाण्यासाठी सर्व सीमा चौक्यांवर अद्ययावत शस्त्रे व साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. २०२७ च्या अखेरीपूर्वी संपूर्ण दलाचे स्ट्राईक प्रशिक्षण पूर्ण केले जाईल. याशिवाय आधुनिक हवाई हल्ल्यांपासून जवानांचे रक्षण करण्यासाठी सीमा भागात मोठ्या प्रमाणावर मजबूत भूमिगत पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. चीनने आपल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) आधुनिकीकरणावर आणि पारंपरिक युद्ध क्षमतेवर प्रचंड निधी खर्च केला असल्याचे नमूद केले.

राजनैतिक व लष्करी चर्चा सुरू ठेवणार : परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि कोणताही गैरसमज टाळण्यासाठी भारत आणि चीन सध्याच्या राजनैतिक व लष्करी यंत्रणेचा वापर सुरू ठेवतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. जयस्वाल म्हणाले, चिनी सैन्याने नेहमीच्या गस्त पद्धतींचे उल्लंघन केल्याने सीमाभागातील परिस्थिती अधूनमधून बिघडते. सीमा व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यासाठी उभय देशांमध्ये चर्चा सुरू आहे. द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी सीमाभागात शांतता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून ठोस भूमिकेचा अभाव : काँग्रेसचा आरोप

आयटीबीपी प्रमुखांच्या या खुलाशानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चीन अरुणाचलमधील शहरांची नावे बदलत असताना आणि सीमेवर विशाल धरणे बांधत असताना सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language