Saudi Arabia flights cancelled : वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर इंडिगो (IndiGo) एअरलाइनने मोठा निर्णय घेत सौदी अरेबियातील चार प्रमुख शहरांसाठीची सर्व विमान उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द केली आहेत. कंपनीने जेद्दा, मदिना, रियाध आणि दम्माम या शहरांतून येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे तूर्तास स्थगित केली आहेत. या निर्णयामुळे सौदी अरेबियातील इंडिगोच्या हवाई सेवेत सुरू असलेला अडथळा अधिकच वाढला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने घडामोडींचा आढावा
विमाने रद्द झाल्याने बाधित झालेल्या प्रवाशांना तिकीट आरक्षणावेळी दिलेल्या संपर्क क्रमांकावर आणि ईमेलद्वारे याबाबत कळवले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या भागातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टीने घडामोडींचा आढावा घेत आहोत, असे इंडिगोने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये (ॲडव्हायझरी) म्हटले आहे. प्रवाशांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगत प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची असल्याचेही कंपनीने अधोरेखित केले आहे.
क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या धमक्यांमुळे चिंता वाढली
सौदी अरेबियात गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेबाबत चिंताजनक वातावरण आहे. देशातील विविध शहरे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यांच्या धमक्या मिळाल्यानंतर या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विमान कंपन्या आपल्या उड्डाणांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक कंपन्यांनी सेवा स्थगित करण्याचा किंवा वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
एअर इंडिया आणि अकासा एअरचेही निर्बंध वाढले
इंडिगो व्यतिरिक्त इतर भारतीय विमान कंपन्यांनीही सौदी अरेबियातील आपल्या सेवांमध्ये बदल केले आहेत. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने रियाध व दम्मामसाठीची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली आहेत, तर जेद्दासाठीच्या उड्डाणांवर वेगवेगळ्या टप्प्यांत परिणाम झाला आहे. दुसरीकडे, अकासा एअरनेही जेद्दा आणि रियाधसाठीच्या विमान सेवांवरील स्थगिती नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवली आहे.
Source: Pudhari News
