Hashtagintro

Indonesia Ancient Rock Art | हवामान बदलामुळे इंडोनेशियातील ६७,८०० वर्षे जुनी शैलचित्रे नष्ट होणार!

जकार्ता : वाढती समुद्रपातळी, पूर, हिमनद्यांचे वितळणे किंवा दुष्काळ अशा विविध रूपांत हवामान बदलाचे परिणाम आपण पाहत आहोत. मात्र, इंडोनेशियातील दुर्गम गुहांमध्ये हा बदल ‘मिठाच्या स्फटिकांच्या’ रूपात मोजला जात आहे. या हवामान बदलामुळे मानवी इतिहासातील सर्वात जुनी आणि मौल्यवान शैलचित्रे कायमची नष्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून, पुरातत्वशास्त्रज्ञांसमोर ती वाचवण्यासाठी काळाशी शर्यत लागली आहे.

वैज्ञानिकांच्या मते, वाढते तापमान, दीर्घकाळ चालणारा कोरडा हंगाम आणि मान्सूनमधील आर्द्रतेचे बदलते प्रमाण यामुळे गुहांमध्ये ‘हॅलोक्लास्टी’ नावाची प्रक्रिया वेगाने घडत आहे. या प्रक्रियेत चुनखडीच्या खडकातून पाझरणारे क्षार स्फटिकांचे रूप घेतात. गुहेतील वातावरण बदलल्यावर हे स्फटिक आकुंचन आणि प्रसरण पावतात, ज्यामुळे खडकांना तडे जाऊन त्यांचे पापुद्रे निघू लागतात. अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत हाताच्या पंजाएवढे शैलचित्रांचे तुकडे निखळून पडल्याचे निरीक्षण इंडोनेशियन पुरातत्वशास्त्रज्ञ शिनात्रिया अधित्यातामा यांनी नोंदवले आहे.

इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर ५०० हून अधिक ठिकाणी शैलचित्रे आढळली आहेत. यामध्ये ५१,२०० वर्षे जुने शिकार करतानाचे चित्र आणि मुना बेटावरील लियांग मेटँडुनो गुहेतील ६७,८०० वर्षे जुन्या हाताच्या ठशाचा समावेश आहे. आधुनिक लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या चित्रांचे वय निश्चित करण्यात आले असून, स्पेनमधील निएंडरथल मानवाच्या कलेपेक्षाही ही चित्रे जुनी असल्याचे सिद्ध झाले आहे. आग्नेय आशियातून ऑस्ट्रेलियाकडे झालेल्या मानवी स्थलांतराचा इतिहास उलगडण्यासाठी हा ठेवा अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ हवामान बदलच नव्हे, तर गुहांजवळील शेती, औद्योगिक विकास आणि खाणकामामुळे उडणारी धूळ व कंपने यामुळेही या ऐतिहासिक कलाकृतींना धोका पोहोचला आहे. इंडोनेशिया सरकारने मुना बेटावरील गुहेला राष्ट्रीय संरक्षित स्थळ घोषित करण्याचे आश्वासन दिले असून, दक्षिण सुलावेसी येथील मारोस-पांगकेप परिसराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language