Hashtagintro

Jalgaon Murder : शिरसोली हादरली! किरकोळ वादाचा भडका, शेतातच फावड्याने सपासप वार करून चुलत भावाचा निर्घृण खून!

जळगाव : किरकोळ वादाचे रूपांतर रक्ताच्या थारोळ्यात होऊन एका निष्पापाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारात सोमवारी दुपारी घडली. दिवाळीच्या कामासाठी चुलत भावाकडे आलेल्या गोरख विठ्ठल ठाकूर (वय ४८, रा. अंतुर्ली) यांच्या डोक्यात संशयित मुकुंदा प्रल्हाद पाटील (वय ५५) याने पावड्याचा जोरदार वार करून त्यांचा जागीच जीव घेतला. या थरारक हत्याकांडामुळे शिरसोली पंचक्रोशीत प्रचंड खळबळ उडाली असून संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील नेव्हरे शिवारात ज्ञानेश्वर राजाराम ठाकूर यांची शेती असून ते शेतातील झोपडीतच वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे दिवाळीच्या कामात हातभार लावण्यासाठी अंतुर्ली येथील त्यांचे चुलत भाऊ गोरख ठाकूर हे तीन दिवसांपूर्वी आले होते. संशयित आरोपी मुकुंदा पाटील आणि गोरख ठाकूर यांची शेतात नियमित भेट व्हायची. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नेव्हरे शिवारातील शेतात हे दोघे समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली.

वाद इतका विकोपास गेला की, संतापाच्या भरात मुकुंदा पाटील याने हातातील धारदार फावड्याने गोरख ठाकूर यांच्या डोक्यात सपासप वार केले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने गोरख ठाकूर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत ठाकूर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

मयत गोरख ठाकूर यांची पत्नी आणि मुलगा कामानिमित्त सध्या पुण्यात वास्तव्यास असून, ऐन सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हत्येनंतर फरार झालेल्या आरोपी मुकुंदा पाटील याच्या मुसक्या आवळण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी पथके रवाना केली असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language