
रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जात असल्यानं पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणावर मराठी मनोरंजनविश्वातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘दशावतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर करत या विषयावर भाष्य केलं आहे.
सुबोध खानोलकर यांची पोस्ट चर्चेत
मराठी चित्रपटसृष्टीत ‘दशावतार’ या चित्रपटानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिचा जंगलतोड आणि निसर्गाच्या ऱ्हासावर भाष्य करणारा एक प्रभावी संवाद आहे. सध्या कर्जतमधील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर हा संवाद पुन्हा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी चित्रपटातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यासोबत त्यांनी लिहिलं, ‘तर…दुष्काळात जगतील पुढच्या पिढ्या! — दशावतार. इतक्या लगेच हे वाक्य खरं होईल असं वाटलं नव्हतं.’ सुबोध यांच्या या पोस्टमधून निसर्गाच्या होणाऱ्या ऱ्हासाबद्दलची चिंता व्यक्त होत आहे. चित्रपटातील संवाद आणि सध्याची परिस्थिती यांची सांगड घालत त्यांनी मोजक्या शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
काय आहे ‘दशावतार’मधील तो संवाद?
‘दशावतार’ चित्रपटातील प्रियदर्शनी इंदलकर हिचा जंगलतोडीवर भाष्य करणारा संवाद सध्याच्या परिस्थितीशी मिळताजुळता असल्यानं विशेष चर्चेत आहे. या संवादातून विकासाच्या नावाखाली जंगलांचा नाश करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निसर्गाचा समतोल बिघडवून साधलेला विकास भविष्यात गंभीर संकट निर्माण करू शकतो, असा संदेश यातून देण्यात आला आहे. ‘कसला विकास करताय? जंगलं तोडून, निसर्ग उद्ध्वस्त करून कसला विकास करताय? विकास पाहिजे; पण निसर्गाचा समतोल संपवून विकास करणार असाल, तर जंगलं संपतील, पाऊसही संपेल. दुष्काळात जगतील पुढच्या पिढ्या’ अशा आशयाचा हा संवाद आहे.
View this post on Instagram
सयाजी शिंदे यांनीही व्यक्त केली नाराजी
अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनीही वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. विकासाच्या नावाखाली सह्याद्रीच्या नैसर्गिक संपत्तीचा नाश होऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. झाडं ही मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची असून, मोठी झाडं तोडून त्यांच्या जागी छोटी रोपे लावणं हा त्याला पुरेसा पर्याय ठरू शकत नाही, असं मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या वादात पर्यावरणाचं संरक्षण आणि विकासाच्या गरजा यांच्यात समतोल राखण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.
Source: TV9 Marathi Entertainment
