मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. 'अगं बाई अरेच्चा!', 'जत्रा', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'बाईपण भारी देवा' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते.
मात्र, यावेळी केदार शिंदे त्यांच्या एका वेगळ्याच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. स्वामींवरील श्रद्धा आणि त्यांच्यावर चित्रपट बनवण्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नुकत्याच सकाळ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे यांनी स्वामींवरील आपली श्रद्धा व्यक्त केली. अनेकदा लोक त्यांना एक प्रश्न विचारतात. तुम्ही स्वामींचे भक्त आहात, मग स्वामींवर चित्रपट का बनवत नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
केदार शिंदे म्हणाले, 'अनेक जण मला विचारतात की, मी स्वामींचा भक्त आहे, तर स्वामींवर चित्रपट का बनवत नाही? पण सिनेमा करणं हा माझा व्यवसाय आहे.'
'मी माझ्या आयुष्यात स्वामींचा व्यवसाय करू शकत नाही. मी रोज स्वामींची पूजा करतो. माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे.' असं केदार शिंदे म्हणाले.
Source: TV9 Marathi Entertainment





