Hashtagintro

Khed Taluka Rainfall: खेड तालुक्यात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा

राजगुरुनगर: खेड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रविवारी (दि. १) रात्री आठच्या सुमारास तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पावसाचा जोर कायम होता. त्यानंतरही संपूर्ण रात्रभर आणि सोमवारी (दि. २) दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने तालुक्यात सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असतानाच रब्बी हंगामाच्या पेरण्या कशा करायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचा सणही चिंतेच्या वातावरणात साजरा होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मात्र, सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होणार असून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसह चारा पिकांच्या पेरण्यांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

या पावसामुळे खेड, शिरूर आणि दौंड तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान, भामा आसखेड आणि कळमोडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढण्यास मदत होणार आहे.

परिणामी धरणांतील पाणीसाठा वाढण्याबरोबरच उपलब्ध पाणीसाठा टिकून राहण्यासही हातभार लागणार आहे. एकंदरीत, दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या खेड तालुक्याला परतीच्या पावसाने दिलासा दिला असून बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य फुलले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language