कोची : केरळमधील (Keral Accident News) एका अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या १७ वर्षीय मुलाने चालवलेल्या भरधाव मर्सिडीज कारच्या धडकेत एका ५५ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण केरळमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचा आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. कोची येथील चेरानाल्लूर भागातील कंटेनर रोडवर रविवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला होता. यामध्ये दुचाकीवरून जाणारे जयाबालकृष्णन (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस आयुक्तांची तडकाफडकी हकालपट्टी
अपघात घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप होत आहे. पोलिसांच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन केरळ सरकारने बुधवारी मोठी कारवाई करत कोचीचे शहर पोलीस आयुक्त कालिराज महेश यांची पदावरून तातडीने हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आता आर. निशांतिनी यांची नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/28/jio-listing-a-diwali-bonus-for-investors-heres-how-much-they-received-per-share/
निष्काळजीपणा भोवला : ४ पोलीस अधिकारी निलंबित
या प्रकरणात सुरुवातीपासूनच हलगर्जीपणा दाखवणाऱ्या चेरानाल्लूर पोलीस ठाण्यातील चार पोलिसांना मंगळवारी संध्याकाळी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये, के.एस. श्याम कुमार (सर्कल इन्स्पेक्टर), व्ही.एस. विश्वजित (स्टेशन हाऊस ऑफिसर), के.टी. मनोज (ग्रेड असिस्टंट सब-इन्स्पेक्टर), अरुण जोशी (सिनियर सिव्हिल पोलीस ऑफिसर) अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) पी. विजयन यांनी स्वतः अपघाताच्या जागेची पाहणी केली, पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड तपासले आणि मृत जयाबालकृष्णन यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनीही विधानसभेत बोलताना स्पष्ट केले की, “या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही.”
सुरुवातीला किरकोळ कलमे लावून जामीन, नंतर न्यायाधीशांवरही गुन्हा!
मृत जयाबालकृष्णन हे रस्त्याच्या कडेला छोटे हॉटेल (ईटरी) चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. अपघातानंतर पोलिसांनी अत्यंत साध्या आणि किरकोळ कलमांखाली गुन्हा दाखल करत आरोपी अल्पवयीन मुलाला पोलीस ठाण्यातूनच जामिनावर सोडून दिले होते. या पक्षपाती कारवाईमुळे लोकांमध्ये प्रचंड राग निर्माण झाला. प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून पोलिसांनी तपासाचा मार्ग बदलला आणि कारचे मालक असलेले अल्पवयीन मुलाचे वडील (अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश) यांनाही या प्रकरणात सह-आरोपी केले आहे.
‘क्राईम ब्रांच’कडे तपास वर्ग; कुटुंब उच्च न्यायालयात जाणार
पोलिसांनी न्यायाधीशांच्या आलुवा येथील फ्लॅटची पाहणी केली असून अपघाताच्या परिसरातील सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. मामल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण तपासाची जबाबदारी आता ‘क्राईम ब्रांच’ (Crime Branch) कडे सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, या प्रकरणात पूर्ण आणि निष्पक्ष न्याय मिळावा यासाठी मृत जयाबालकृष्णन यांच्या कुटुंबाने केरळ उच्च न्यायालयात (High Court) दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
Source: Prahaar News
