Hashtagintro

Kolhapur Moneylending : ५० हजारांचे कर्ज, ३.५० लाखांची वसुली

कोल्हापूर : दरमहा २० टक्के व्याजाने सावकारीतून ५० हजारांचे कर्ज… आजवर ३ लाख ५० हजार रुपयांची वसुली करूनही पुन्हा ६ लाखांसाठी तगादा… राहते घर, चार चाकी मोटार जबरदस्तीने बळकाविण्याचा प्रयत्न… रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील रूपाली शिंगाडेसह पती कृष्णात (रा. शाहूनगर) यांनी मांडली पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे कैफियत… हुपरीतील सावकारासह पंटरच्या दहशतीला कंटाळून या दाम्पत्याची न्यायासाठी भटकंती सुरू आहे.

हुपरी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवूनही दाम्पत्याच्या कैफियतीची दखल न घेतल्याने पोलिस यंत्रणेकडून न्याय मिळणार की नाही, अशी संभ्रमावस्था झालेल्या शिंगाडे दाम्पत्याने अखेर न्यायालयात धाव घेतली आहे. शिंगाडे दाम्पत्याने कौटुंबिक कारणासाठी हुपरी (ता. हातकणंगले) येथील सावकाराकडून २० टक्के व्याजाने ५० हजार रुपयांचे कर्ज उचलले. टप्प्याटप्प्याने रोख ९१ हजार रुपये व २ लाख ७१ हजार ४५० रुपये ऑनलाईनद्वारे परत केले. तरीही सावकारासह पंटरचा ६ लाखांच्या वसुलीसाठी तगादा सुरू आहे.

वसुलीसाठी राहते घर आणि चार चाकी मोटार जबरदस्तीने बळकाविण्याचा प्रयत्न झाला. सावकाराच्या त्रासामुळे हतबल झालेल्या शिंगाडे दाम्पत्याने हुपरी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजविले. अधिकाऱ्यांना साकडे घातले. मात्र पाझर फुटला नाही.

अखेर या दाम्पत्याने कागदोपत्री पुराव्यासह पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक आप्पासाहेब जाधव यांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे. यंत्रणेकडून न्याय मिळेल की नाही, ही शंका त्यांच्या मनात आहे. त्यामुळे रूपाली शिंगाडे यांनी शनिवारी न्यायालयात धाव घेतली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language