Hashtagintro

Kolhapur News : कोल्‍हापूरला पोलिस आयुक्तालय होणार तरी कधी?

दिलीप भिसे

कोल्हापूर : तब्बल चार दशकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सर्किट बेंच स्थापन झाले. कालांतराने कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाबाबतही शासनस्तरावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, संघर्षाशिवाय काहीच पदरी पडत नाही ही लोकभावना झाली आहे. पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव १९८५ पासून (४० वर्षे) लालफितीत रखडला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दफ्तर दिरंगाईत प्रस्ताव धूळ खात आहे. आता नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार का, याकडे कोल्हापूरकरांचे डोळे लागले आहेत.

कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाच्‍या प्रस्तावानंतर पिंपरी-चिंचवडसह अन्यत्र पोलिस आयुक्तालये साकारली गेली. मात्र, कोल्हापूरच्‍या मुद्द्यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि सत्ताधाऱ्यांकडून उपेक्षाच राहिली. शहर व जिल्ह्यात समाजकंटकांसह संघटित टोळ्यांचे कारनामे, अमली पदार्थ तस्करी, गरिबांचे शोषण करून दहशत माजविणाऱ्या घटकांचे साम्राज्य वाढले आहे. धार्मिकस्थळे, औद्योगिकीकरण, शिक्षण, व्यापार, पर्यटन, कायदा- सुव्यवस्थेसह ऊस दर आंदोलन, संप, मोर्चे, व्‍हीआयपी बंदोबस्त यामुळे पोलिस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याने कोल्हापूरला पोलिस आयुक्तालयाची गरज निर्माण झाली आहे.

सुधारित प्रस्तावही धूळ खात

७ एप्रिल२०१६ रोजी तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पोलिस आयुक्तालयाचा सुधारित प्रस्ताव तयार केला. तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यात बदल सुचविले. आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी जुने गोळीबार मैदान, सर्व्हे नं. ८ अ येथील ९ हेक्टर जागेचा प्रस्तावही दिला गेला. कोल्हापूर पोलिस दलासाठी वाढीव दीड हजारावर मनुष्यबळ मागण्‍यात आले. जून २०१७ मध्ये सुधारित प्रस्ताव सादर झाला. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language